मालेगाव: महावितरणच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभाराचा बळी जाण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. बागलाण तालुक्यातील तरसाळी येथील ३९ वर्षीय तरुण शेतकरी प्रवीण दत्तात्रेय रौंदळ यांचा उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे तरसाळी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, शेतकरी वर्गातून महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण रौंदळ यांच्या शेतात पत्र्याचे कांदा शेड आहे. या शेडच्या जवळच असलेल्या नारळाच्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यातील वाषलेल्या फांद्या काढण्यासाठी प्रवीण हे कांदा शेडच्या पत्र्यावर चढले होते. फांद्या छाटत असताना, शेडवरून गेलेल्या ३३ केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा अचानक त्यांना स्पर्श झाला. हा विजेचा धक्का इतका भीषण होता की, प्रवीण हे गंभीररीत्या भाजले जाऊन जागीच कोसळले.
या भीषण अपघातानंतर शेजारील शेतकरी आणि कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या प्रवीण यांना तातडीने सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासताच मृत घोषित केले. या बातमीने रौंदळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरुवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात प्रवीण यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रवीण हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई,भाऊ,भावजय असा परिवार आहे.
शेतकरी वर्गात तीव्र संताप
घर आणि कांदा शेडजवळून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्या लोंबकळत होत्या. त्याबद्दल स्थानिकांकडून महावितरण कंपनीकडे यापूर्वी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले, असा आरोप मृत प्रवीण रौंदळ यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच धोकेदायक वीज वाहिन्या हलविण्याची खबरदारी वेळेत घेतली गेली असती, तर आज प्रवीणचा जीव वाचला असता, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कष्टाळू शेतकऱ्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने तरसाळी परिसरातील शेतकरी वर्गात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. आता तरी महावितरण कंपनीला जाग येईल का? की अजून काही बळी जाण्याची वाट पाहणार? असा संतप्त सवाल देखील उपस्थित केला जात असून, दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान,याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
