Balasaheb Shiv Sena office in Nashik Corporate diversion first party office in the state ysh 95 | Loksatta

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नाशिकमध्ये तंत्रस्नेही कार्यालय; राज्यातील पहिल्या पक्ष कार्यालयास कॉर्पोरेट वळण

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने पक्षविस्ताराच्या दृष्टीने तयारीला वेग दिला असून त्याअंतर्गत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे राज्यातील पहिले आलिशान आणि तितकेच चकचकीत पक्ष कार्यालय नाशिक येथे सुरू केले आहे.

ns balasaheb office
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नाशिकमध्ये तंत्रस्नेही कार्यालय

अनिकेत साठे

नाशिक : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने पक्षविस्ताराच्या दृष्टीने तयारीला वेग दिला असून त्याअंतर्गत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे राज्यातील पहिले आलिशान आणि तितकेच चकचकीत पक्ष कार्यालय नाशिक येथे सुरू केले आहे. दीड हजार चौरस फुटांचे हे वातानुकूलित कार्यालय आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. त्याची रचना कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे आहे. इमारतीच्या गच्चीवर तीन हजार चौरस फूट जागेत कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

 नाशिक शहर आणि जिल्ह्याचे हे संपर्क कार्यालय गंजमाळ भागातील रेणुका प्लाझामध्ये दुसऱ्या मजल्यावर आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हास्तरावरील राज्यातील हे पहिलेच पक्ष कार्यालय आहे. त्याचे उद्घाटन खुद्द पक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यालय बघितल्यावर तेही थक्क झाले. अतिशय सुंदर कार्यालय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदविल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे शिंदे गटाच्या कार्यालयापासून पायी दोन-तीन मिनिटांच्या अंतरावर शिवसेनेचे (ठाकरे गट) कार्यालय आहे. शालिमार चौकातील ठाकरे गटाचे कार्यालय आणि शिंदे गटाचे नवीन कार्यालय यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. अडीच वर्षांच्या सत्ताकाळात ठाकरे गटाने एकदा आपल्या कार्यालयाचे नूतनीकरण केले होते. गळती बंद करणे, पीओपीची कामे, रंगरंगोटी अशी प्रामुख्याने देखभाल दुरुस्तीची कामे झाल्याचे (ठाकरे) गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे मान्य करतात. शिंदे गटाने स्थानिक पातळीवर आपले बस्तान बसविण्यासाठी आपले कार्यालय आखीवरेखीव आणि सोयी-सुविधांनी सज्ज राखण्यासाठी युद्ध पातळीवर नियोजन केल्याचे दिसून येते.

शिंदे गटाच्या कार्यालयात प्रवेश करतानाच त्याचे वेगळेपण जाणवू लागते. आत फेरफटका मारल्यानंतर आपण पक्ष कार्यालयात आहोत की खासगी बँक वा एखाद्या कंपनीत, असा प्रश्न पडतो. मुख्य कार्यालय आणि गच्चीवरील बैठकीची व्यवस्था मिळून सुमारे साडेचार हजार चौरस फूट जागा आहे. समोरच मदत कक्ष आहे. भेटीसाठी येणाऱ्यांसाठी खास प्रतीक्षालय आहे. कार्यालयातील आसन व्यवस्था मुलायम ठेवण्याचा कटाक्षाने विचार झालेला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्यासाठी आठ स्वतंत्र कक्ष आहेत. वायफाय सुविधा. समाजमाध्यमांवर सक्रिय राहण्यासाठी स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान कक्ष (आयटी सेल) स्थापन केला जात आहे. गच्चीवर एकाच वेळी २५० ते ३०० कार्यकर्त्यांच्या बैठकीची व्यवस्था केली जात असल्याचे खा. हेमंत गोडसे आणि महानगरप्रमुख प्रवीण तिदमे सांगतात. उद्घाटन सोहळय़ात सहभागी झालेल्या अक्षय कलंत्रीसह अनेक कार्यकर्ते पक्षाने जाणीवपूर्वक कार्यालयाला कॉर्पोरेट चेहरा दिल्याचे नमूद करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार हे कार्यालय म्हणजे नव्या व समृद्ध महाराष्ट्राची नांदी आहे. संघटना विस्तारण्याची सुरुवात नाशिकमधून होत आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-10-2022 at 00:02 IST
Next Story
मालेगाव : नकली बंदूक दाखवत चोरट्याचा मालेगावात भरदिवसा धुमाकूळ