balasaheb thorat criticize eknath shinde over maharashtra karnataka border dispute | Loksatta

‘सीमावादावर मुख्यमंत्री गप्प का?’; बाळासाहेब थोरात यांचा प्रश्न

थोरात म्हणाले. कर्नाटकात महाराष्ट्रातील गाड्यांवर होणऱ्या हल्ल्याची जबाबदारी भाजपाने घेतली पाहिजे. केंद्रीय नेतृत्वाने त्यांना तशा सूचना दिल्या पाहिजे.

‘सीमावादावर मुख्यमंत्री गप्प का?’; बाळासाहेब थोरात यांचा प्रश्न
बाळासाहेब थोरात आणि एकनाथ शिंदे (संग्रहित छायाचित्र)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करीत असून, राज्यपालांना महाराष्ट्राचा इतिहासच माहिती नाही. ते राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य करतात. आता राज्यातील जनता सहन करणार नाही. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर मुख्यमंत्री का बोलत नाहीत, असा प्रश्‍न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.

हेही वाचा- जळगाव : जिल्हा दूध संघ निवडणूक ; एकनाथ खडसे- मंगेश चव्हाण यांचे आरोप-प्रत्यारोप

येथे शुक्रवारी काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचे पुत्र डॉ. अनिकेत यांच्या विवाह सोहळ्यासाठी आलेले थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सत्ताधार्‍यांवर जोरदार हल्लाबोल केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई वादग्रस्त वक्तव्य करीत असून तेथील जनताही हल्ले करीत आहे, याची भाजपाने जबाबदारी घेतली पाहिजे. केंद्रीय नेतृत्वाने त्यांना सूचना दिल्या पाहिजेत. दुर्दैवाने हे सर्व घडत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काहीच बोलत नाहीत. मराठी जनतेच्या पाठीशी सर्वपक्षीय नेत्यांनी राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि राज्य सरकार काय भूमिका घेत आहे, हे समजून सांगावे. दुर्दैवाने असे काही होताना दिसत नाही. मराठी माणसांवर हल्ले होणार नाही, याची जबाबदारी केंद्राने घेतलीच पाहिजे, असेही थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा- ‘विकासालाच जनतेचा कौल’: गुजरात निवडणूक निकालावर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

राज्यपाल कधी महात्मा फुलेंवर बोलतात, सावित्रीबाईंवर बोलतात. खरेतर त्यांना महाराष्ट्राचा इतिहासच माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असा इशाराही थोरात यांनी दिला. गुजरातमध्ये महाराष्ट्रातील प्रकल्प पळवून नेऊन भाजपने यश मिळविले, असा दावा त्यांनी केला.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 17:58 IST
Next Story
आच्छादित द्राक्षांना भाव; पूर्वहंगामी द्राक्षांच्या संरक्षणासाठी खर्चीक प्रयोग यशस्वी, प्रति किलो ११५ रुपयांपर्यंत दर