जळगाव : मध्य रेल्वेकडून बनारस–हडपसर दरम्यान दररोज धावणाऱ्या अमृत भारत एक्स्प्रेस गाडीची नियमित सेवा शनिवारपासून सुरू करण्यात येत आहे. या नव्या रेल्वे सेवेने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः भुसावळ, जळगावहून दररोज दुपारच्या वेळी पुणे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
गाडी क्रमांक २२५९० हडपसर-बनारस दैनिक अमृत भारत एक्स्प्रेस ०४ मेपासून दररोज सकाळी ०७.५० वाजता हडपसर येथून सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०२.३० वाजता बनारस येथे पोहोचेल. ही गाडी दुपारी ०३.२२ वाजता जळगाव येथे थांबेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक २२५८९ बनारस-हडपसर दैनिक अमृत भारत एक्स्प्रेस ०२ मेपासून दररोज सायंकाळी ०६.१५ वाजता बनारस येथून सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ००.१० वाजता हडपसर पुणे येथे पोहचेल. ही गाडी दुपारी ०३.४५ वाजता जळगाव येथे थांबेल. या वेळापत्रकामुळे प्रवाशांना सोयीस्कर वेळेत प्रवासाचे नियोजन करता येणार आहे.
१८०० पेक्षा अधिक प्रवासी क्षमता
हडपसर-बनारस या गाडीचे थांबे दोन्ही बाजूने दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज जंक्शन आणि ज्ञानपूर रोड या महत्त्वाच्या स्थानकांवर असतील. त्यामुळे विविध औद्योगिक, शैक्षणिक आणि धार्मिक केंद्रांना आपोआप थेट रेल्वे जोडणी मिळणार आहे. अमृत भारत एक्स्प्रेस ही पूर्णपणे आधुनिक रचनेची गाडी असून यात एकूण ०८ स्लीपर क्लास, ११ जनरल सेकंड क्लास आणि ०२ सेकंड सीटिंग कम (केवळ बसण्याची सोय असलेले) गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि ०१ पॅन्ट्री कार, अशा एकूण २२ डब्यांचा समावेश आहे. या गाडीची प्रवासी क्षमता सुमारे १८०० पेक्षा अधिक आहे. ज्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांना एकाच वेळी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
अमृत भारत एक्स्प्रेसची ही वैशिष्ट्ये
सुरक्षिततेच्या दृष्टीने या गाडीत ‘कवच’ प्रणाली बसविण्यात आली आहे, जी भारतीय रेल्वेची अत्याधुनिक ट्रेन टक्कर प्रतिबंधक प्रणाली आहे. तसेच ‘पुश-पुल’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने गाडीला जलद वेग प्राप्त होतो. ब्रेकिंग अधिक सुरक्षित आणि धक्केविरहित होते. प्रवासाचा कालावधीही कमी होण्यास मदत होते. गाडीत अग्निरोधक पडदे तसेच स्वच्छतागृह आणि विद्युत कक्षांमध्ये एरोसोल-आधारित अग्निशमन प्रणाली बसवण्यात आली आहे.
एलईडी प्रकाश व्यवस्था, एर्गोनॉमिक पद्धतीने तयार केलेली आसन व्यवस्था व बर्थ्स, प्रत्येक प्रवाशासाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट्स, सीसीटीव्ही यंत्रणा आणि पब्लिक ॲड्रेस व प्रवासी माहिती प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपंग प्रवाशांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. सुलभ प्रवेश, विशेष स्वच्छतागृहे आणि आधुनिक व्हॅक्यूम-इव्हॅक्युएशन प्रणालीमुळे स्वच्छता आणि दुर्गंधी नियंत्रण अधिक प्रभावीपणे राखले जाईल. डब्यांमधील पूर्णपणे सीलबंद जोडमार्गामुळे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सुलभ हालचाल करता येईल.
शनिवारपासून आरक्षण सुरु
गाडी क्रमांक २२५९० साठीचे आरक्षण दिनांक शनिवारपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसी या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी प्रवासी यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट काढू शकतात तसेच रेलवन या मोबाईल ॲपचा वापर करूनही तिकीट बुकिंग करता येईल. प्रवाशांना गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि इतर सविस्तर माहिती मिळवण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करणे उपयुक्त ठरणार आहे. या नव्या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि परवडणारा प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.
