जळगाव : पश्चिम रेल्वेच्या सुरत स्थानकावर सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे काही महत्त्वाच्या मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या सेवांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आल्याने त्याचा मोठा परिणाम खान्देशातील प्रवाशांच्या प्रवास नियोजनावरही होणार आहे. वाढत्या प्रवासी संख्येला आणि भविष्यातील रेल्वे वाहतुकीच्या गरजांना लक्षात घेऊन सुरत स्थानकावर ट्रॅक दुरुस्ती, यार्ड रिमॉडेलिंग, सिग्नलिंग सुधारणा आणि प्लॅटफॉर्म विस्ताराची कामे काही दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू आहेत.
पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १२९३५ वांद्रे टर्मिनस–सुरत इंटरसिटी एक्स्प्रेस लोकप्रिय दैनंदिन गाडी ३० मार्च ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत सुरतपर्यंत धावणार नाही. ती उधना स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. ही गाडी मुंबई आणि सुरत दरम्यान प्रवास करणाऱ्या व्यावसायिक, नोकरदार आणि दैनंदिन प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या बदलामुळे प्रवाशांना उधना येथे उतरून पुढे दुसरी रेल्वे, बस किंवा इतर वाहतूक साधनांचा वापर करून सुरत गाठावे लागणार आहे. तसेच, गाडी क्रमांक २०९२५ सुरत–अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस २ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत सुरतऐवजी उधना स्थानकावरूनच सुटणार आहे. यामुळे खान्देश आणि विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांना सुरतऐवजी उधना येथून गाडी पकडावी लागेल. विशेषतः अमरावती, अकोला, भुसावळ, जळगाव, अमळनेर, दोंडाईचा आणि नंदुरबार या भागातील प्रवाशांसाठी ही गाडी महत्त्वाची असल्याने प्रवाशांना वेळेआधी नियोजन करावे लागणार आहे.
याचप्रमाणे, गाडी क्रमांक २०९२६ अमरावती–सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस ३० मार्च ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत सुरतपर्यंत न जाता उधना येथेच आपला प्रवास समाप्त करणार आहे. त्यामुळे भुसावळ, जळगाव, अमळनेर, दोंडाईचा, नंदुरबारहून सुरतला जाणाऱ्या प्रवाशांना उधना येथे उतरून पुढील प्रवासासाठी पर्यायी साधनांचा वापर करावा लागणार आहे. सुरत स्थानक हे पश्चिम रेल्वेवरील अत्यंत व्यस्त आणि महसूलदृष्ट्या महत्त्वाचे स्थानक असल्याने तेथे आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याअंतर्गत प्रवासी सुविधा सुधारणा, फलाटांची क्षमता वाढवणे, गाड्यांच्या हालचाली अधिक सुरक्षित आणि वेगवान करणे यावर भर दिला जात आहे. भविष्यात या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर गाड्यांची वेळपालनता सुधारेल. तसेच प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास पश्चिम रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
रेल्वे प्रशासनाचे हे आवाहन
दरम्यान, या बदलांमुळे काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना उधना स्थानकाचा विचार करून पर्यायी वाहतुकीची व्यवस्था आधीच निश्चित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, गाड्यांचे सुधारित वेळापत्रक, थांबे आणि रचना याबाबत अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे. एनटीईएस किंवा इतर अधिकृत रेल्वे अॅप्सचा वापर करण्याचेही सुचवण्यात आले आहे. एकूणच, सुरत स्थानकावरील ही पायाभूत कामे तात्पुरती अडचण निर्माण करत असली, तरी दीर्घकालीन दृष्टीने पश्चिम रेल्वेच्या प्रवासी सेवांमध्ये गुणात्मक वाढ घडवून आणतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
