धुळे : अलीकडे अनेकांचे बँक खाते अचानक फ्रीझ होणे, क्षणार्धात यूपीआय सेवा बंद पडणे, एटीएम कार्ड निकामी होणे, पगार अडकणे किंवा व्यवसाय ठप्प होणे अशा गंभीर समस्या वाढू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत एकच प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होतो- बँक खाते फ्रीझ झाले म्हणजे खातेदार गुन्हेगार ठरतो का? यासंदर्भात सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

अॅड. भंडारी म्हणाले, आपण डिजिटल युगात वेगाने पुढे जात आहोत; मात्र त्यासोबत काही दुष्परिणामही समोर येत आहेत. त्यातील सर्वात मोठी भीती म्हणजे सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात नाहक अडकण्याची. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रासह विविध राज्यांत बँक खाती अचानक फ्रीझ झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक वेळा कोणताही थेट संबंध नसताना सामान्य खातेदारांवर संशय घेतला जातो. परिणामी, तपास यंत्रणा आणि बँका खबरदारी म्हणून खाती तात्पुरती गोठवतात.

  • खाते फ्रीझ म्हणजे नेमके काय?

बँक खाते फ्रीझ होणे म्हणजे तपास यंत्रणा किंवा बँकेने खात्यातील व्यवहारांवर तात्पुरती बंदी घालणे होय. एखाद्या खात्यात सायबर फसवणुकीशी संबंधित किंवा संशयास्पद रक्कम जमा झाल्याचा संशय असल्यास पोलिस संबंधित बँकेला ते खाते ‘होल्ड’ किंवा ‘फ्रीझ’ करण्याचे निर्देश देतात. मात्र, याचा अर्थ खातेदार दोषी आहे असा होत नाही.

केंद्रीय गृह मंत्रालय आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांनी नुकतीच प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली आहे. त्यानुसार केवळ संशयास्पद रकमेपुरतेच व्यवहार मर्यादित ठेवावेत; संपूर्ण खाते फ्रीझ करणे हा शेवटचा पर्याय असावा. खातेदाराला दैनंदिन व्यवहार, पगार किंवा औषधोपचारासाठी आवश्यक रक्कम वापरता यावी याची काळजी घ्यावी.

खाते किंवा त्यातील रक्कम फ्रीझ केल्यास बँकेने तत्काळ एसएमएस किंवा ई-मेलद्वारे कारणासहित माहिती देणे बंधनकारक आहे. केवळ संशयाच्या आधारावर संपूर्ण नेट बँकिंग किंवा यूपीआय सेवा बंद करण्यापूर्वी योग्य पडताळणी करणे आवश्यक आहे. खाते फ्रीझ केल्यानंतर २० दिवसांत कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही किंवा न्यायालयाचा आदेश प्राप्त झाला नाही, तर खातेदाराला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे.

  • खाते फ्रीझ झाले तर काय कराल

आपल्या होम ब्रँचमध्ये जाऊन लेखी स्वरूपात कारण विचारावे. संबंधित पोलिस ठाण्याचा पत्ता व कोणत्या राज्यातील सायबर विभागाने कारवाई केली आहे याची माहिती घ्यावी. अधिकृत तक्रार अर्ज दाखल करावा. बँकेला ती तक्रार सात दिवसांत तपास अधिकाऱ्याकडे पाठवणे बंधनकारक आहे. केवळ पडताळणीसाठी खाते फ्रीझ झाले असल्यास आवश्यक कागदपत्रे किंवा व्हिडिओ कॉलद्वारे ओळख पटवून खाते अनफ्रीझ करण्याची विनंती करता येते.

तपासात विलंब होत असल्यास किंवा आपली बाजू ऐकून घेतली जात नसल्यास वकिलामार्फत किंवा स्वतः न्यायालयात दाद मागता येते. बहुतांश प्रकरणांत खाते फ्रीझ होण्यामागे सायबर फसवणुकीची तक्रार कारणीभूत असते. पीडित व्यक्ती राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर किंवा १९३० या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवते. त्यानंतर संशयित रक्कम ज्या-ज्या खात्यांतून फिरली आहे, ती सर्व खाती तपासासाठी तात्पुरती ‘होल्ड’ किंवा ‘फ्रीझ’ केली जातात. ही कारवाई अनेकदा केवळ संशयावर आधारित असते; त्यामुळे खातेदार दोषी ठरतो असे नाही.

  • खातेदार दोषी कसा…

बँक खाते फ्रीझ झाले म्हणजे खातेदार गुन्हेगार ठरतोच असे नाही. योग्य पडताळणी, कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांनंतर निर्दोष व्यक्तीचे खाते अनफ्रीझ केले जाते. डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे, अनोळखी व्यवहार टाळणे आणि खात्यातील प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवणे हेच सुरक्षिततेचे खरे सूत्र आहे.