मालेगाव: स्वतःच्या पदाचा गैरवापर करून ग्राहकाच्या परवानगीशिवाय खात्यातून ३० लाख रुपये हडप केल्याचा धक्कादायक प्रकार बँक ऑफ महाराष्ट्रच्या मालेगाव शहर शाखेत उघडकीस आला आहे. या प्रकरणी तत्कालीन बँक मॅनेजर प्रतिक मीना याच्यावर मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीताला अद्याप अटक मात्र झालेली नाही.

​मालेगाव तालुक्यातील टिंगरी येथील शेतकरी राहुल राजेंद्र जाधव यांची ‘राजांकुश फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड’ नावाची फर्म आहे. या कंपनीच्या व्यापारासाठी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या मालेगाव शाखेत कॅश क्रेडिट खाते उघडले आहे. या क्रेडिट खात्याची मर्यादा १ कोटी रुपये आहे. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी, तत्कालीन मॅनेजर प्रतिक मीना याने राहुल जाधव यांच्या संमतीशिवाय आणि त्यांच्याकडे मूळ चेक असतानाही, केवळ चेक नंबरचा वापर करून खात्यातून ३० लाख रुपये दोन वेगवेगळ्या खात्यांवर वळवल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले होते.

 बँक मॅनेजरने काय दिले कारण?

​जेव्हा जाधव यांनी या व्यवहाराबाबत विचारणा केली, तेव्हा मॅनेजर मीना याने ‘बँक ॲडजस्टमेंटसाठी हे पैसे सतिश धोंडगे आणि गणेश देशमुख यांच्या खात्यावर वर्ग केले असून ते लवकरच परत मिळतील,’ असे आश्वासन दिले होते. मात्र, वारंवार तगादा लावूनही पैसे परत मिळाले नाहीत. दरम्यानच्या काळात प्रतिक मीना याचे निलंबन झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर जाधव यांचे धाबे दणाणले.

 ​’पैसे तर गेलेच, वर व्याजाचाही भुर्दंड!’

बँक क्रेडिट खात्यातून ३० लाखाची रक्कम परस्पर वर्ग होऊन १५ महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मात्र,वारंवार  तगादा लावूनही​ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या खात्यात पैसे परत केले गेले नाहीत. वरुन १२ टक्के व्याज दराने १५ महिन्यांचे या ३० लाखांवर सुमारे ४.५० लाख रुपये व्याज बँकेला भरावे लागल्याने कंपनीला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राहुल जाधव यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार ​मालेगाव शहर पोलिसांनी याप्रकरणी विश्‍वासघात आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन गायकर हे करीत आहेत. या गुन्ह्यात मॅनेजरसह इतर कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

 कुंपणानेच शेत खाल्ले तर..

बँक अधिकारी हे ग्राहकांच्या पैशांचे रक्षक मानले जातात, मात्र एका बँक मॅनेजरनेच आपल्या पदाचा दुरुपयोग करून ग्राहकाच्या विश्वासाला तडा देण्याच्या या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच या निमित्ताने बँकेतील अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.