मालेगाव : बारामती येथील पठारावरील ‘टेबल टॉप’ पद्धतीचे विमानतळ अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने या विमानतळाचा नागपूर, नाशिक, पुणे आणि शिर्डी विमानतळांच्या धर्तीवर अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेसह तातडीने विस्तार व्हावा,असे अजित पवार यांचे स्वप्न होते.

दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे तेथे झालेल्या विमान दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा बारामती विमानतळ सुरक्षा व्यवस्थेचा आधुनिक सोयी-सुविधांसह विस्तार करावा, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे मत बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी मांडले आहे.

या संदर्भात चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसेच केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू आणि केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदने पाठवली आहेत. बारामती विमानतळावर उतरताना विमान दुर्घटना होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अजित पवार यांच्या सारख्या कर्तुत्ववान नेत्याच्या अकाली निधनामुळे राज्याची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्रातील घराघरात हक्काचा माणूस गेल्याचे दुःख उमटले आहे. विमान दुर्घटनेत राज्याने एक कामाचा, विकासाचा आणि व्यापक जनाधार असलेला नेता गमावला असल्याचे चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.

लहान विमानतळांची सुरक्षा ऐरणीवर

विमान दुर्घटनेच्या या अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटनेनंतर राज्यातील लहान व मध्यम विमानतळांच्या सुरक्षिततेबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि चिंता व्यक्त केली जात आहे. बारामती येथील विमानतळ हे पठारावरील ‘टेबल टॉप’ पद्धतीचे विमानतळ असून, दोन्ही बाजूंनी खोल उतार आणि दरीसदृश परिस्थिती आहे.

अशा भौगोलिक रचनेमुळे कमी दृश्यता, खराब हवामान किंवा आपत्कालीन परिस्थितीत विमानाचे लँडिंग व टेकऑफ करणे या गोष्टी अत्यंत जोखमीच्या ठरू शकतात. २८ जानेवारीच्या दुर्दैवी घटनेने या धोक्याचे वास्तव संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले असून राज्य होरपळून निघाले आहे.

..तर विमान दुर्घटना टळली असती?

बारामती विमानतळाच्या विकासासाठी अजित पवार हे विशेष आग्रही होते. विमानतळाच्या दर्जावाढीसाठी, अत्याधुनिक सुरक्षा सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसेच सर्व सोयी-सुविधांसह विस्तार करण्यासाठी त्यांनी अनेक वेळा बैठका घेऊन सातत्याने प्रयत्न केले होते.

बारामती विमानतळ आधुनिक करण्याचे त्यांचे स्वप्न होते. दुर्दैवाने आजपर्यंत ते पूर्ण होऊ शकले नाही. या विमानतळाचा सुरक्षा विस्तार यापूर्वीच झाला असता तर कदाचित ही विमान दुर्घटना टळली असती. त्यामुळे भविष्यात अशी कोणतीही दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, यासाठी बारामती विमानतळाचा नागपूर, नाशिक, पुणे, शिर्डी या विमानतळांप्रमाणे अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, विस्तारित धावपट्टी, आधुनिक लँडिंग प्रणाली आणि आपत्कालीन सुविधा यांसह विकास करणे अत्यंत आवश्यक आहे. बारामती विमानतळाची सुरक्षित, आधुनिक आणि दर्जेदार पुनर्रचना करणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.