नाशिक: पुरुषांंप्रमाणेच नाशिकच्या महिला क्रिकेट खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वरिष्ठ महिला एक दिवसीय सामन्यांची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना नाशिकची एक खेळाडू सातत्याने आपल्या बॅटचे पाणी प्रतिस्पर्ध्यांना पाजत आहे. तिच्या दमदार फलंदाजीमुळे महाराष्ट्राने या स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे या महिला खेळाडूने स्पर्धेत सलग तीन अर्धशतक झळकावून आपले कर्तृत्व सिध्द केले आहे.
पुरुषांप्रमाणेच महिला क्रिकेटला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. महिला खेळाडूंनाही पालकांकडून प्रोत्साहन मिळू लागले आहे. त्याप्रमाणे महिला खेळाडूंच्या कामगिरीकडेही आता सर्वजण लक्ष ठेवून असतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयतर्फे आयोजित वरिष्ठ महिला एक दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत राजकोट येथे ६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्र संघाचे साखळी सामने होत आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून सलामीला खेळणाऱ्या नाशिकच्या तेजस्विनी बाटवालने आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. तेजस्विनी एक उत्कृष्ट यष्टीरक्षकही आहे.
या स्पर्धेत आसामवरील महाराष्ट्राच्या विजयात तेजस्विनीने दमदार ७० धावा करून लागोपाठ तिसरे अर्धशतक झळकावले. आसाम संघाने प्रथम फलंदाजी करत ४५ षटकांत ७ बाद २०१ धावा केल्या. सलामीच्या खुशी शर्मा ८१ व अमोन्तिका मुंडाच्या ५२ धावांनंतर कोणीच विशेष चमक दाखवू शकले नाही. मुक्ता मगरेने २ गडी बाद केले. महाराष्ट्राने विजयासाठीच्या २०२ धावा सलामीला खेळणाऱ्या तेजस्विनी बाटवालच्या ९ चौकरांसह ७० तसेच गौतमी नाईक व कर्णधार अनुजा पाटील यांच्या अर्धशतकांच्या जोरावर केवळ ३०.१ षटकांत ८ गडी राखून सहज पार केल्या. यासह महाराष्ट्राने पुदुचेरी व उत्तर प्रदेश पाठोपाठ आसामवरील मोठ्या विजयाने आपल्या सलग तिसऱ्या विजयाची देखील नोंद केली.
नाशिकच्या तेजस्विनी बाटवालने याआधी उत्तर प्रदेशवरील विजयात जोरदार ८३ धावा केल्या होत्या. उत्तर प्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करत ४९.१ षटकांत २७६ धावा केल्या होत्या. महाराष्ट्रातर्फे यष्टीरक्षक तेजस्विनी बाटवालने यष्टीमागे दोन गडी बाद करण्यात वाटा उचलला. महाराष्ट्राने विजयासाठीच्या २७७ धावा सलामीच्या तेजस्विनी बाटवालच्या १० चौकरांसह ८३, कर्णधार अनुजा पाटीलच्या नाबाद ५३ व मुक्ता मगरेच्या ४८ धावांच्या जोरावर ४८.१ षटकांत ६ गडी राखून पार करत लागोपाठ दुसऱ्या विजयाची नोंद केली. तेजस्विनीने पहिल्या गड्यासाठी ८४ व दुसऱ्या गड्यासाठी ८९ धावांच्या महत्वपूर्ण भागीदाऱ्या केल्या.
स्पर्धेतील पहिल्या सामान्यात तेजस्विनी बाटवालने पुदुचेरीवरील विजयात अर्धशतक झळकावून मोठा वाटा उचलला. पुदुचेरी संघाने प्रथम फलंदाजी करत ४८.२ षटकांत १७९ धावा केल्या.यष्टीरक्षक तेजस्विनी बाटवालने ३ झेल टिपले. विजयासाठीच्या १८० धावा सलामीच्या तेजस्विनी बाटवालच्या ९ चौकरांसह ५३, तेजल हसबनीसच्या नाबाद ६३ व कर्णधार अनुजा पाटीलच्या नाबाद ३३ धावांच्या जोरावर केवळ २९.२ षटकांत फटकावून महाराष्ट्राने ८ गडी राखून मोठा विजय मिळवला. तेजस्विनीने पहिल्या दोन गड्यांसाठी अर्धशतकी भागीदारी केल्या.
तेजस्विनी बाटवालच्या फलंदाजीतील या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

