जळगाव : महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ तसेच गुजरात, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे बोर्डाने १९०२१/१९०२२ ब्रह्मपूर–उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस गाडी त्रि-साप्ताहिक सेवेतून आता दररोज चालविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना आठवड्यातील मर्यादित फेऱ्यांऐवजी वर्षभर नियमित प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
पूर्व किनारी रेल्वे (ईस्ट कोस्ट रेल्वे) प्रशासनाच्या आदेशानुसार या गाडीची ०८४११ ब्रह्मपूर–उधना उद्घाटन विशेष फेरी सोमवारी ६ जुलै २०२६ रोजी दुपारी ५.०० वाजता ब्रह्मपूर स्थानकावरून रवाना होणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही वेळ तात्पुरती असून, अंतिम वेळापत्रकात आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो.
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
ब्रह्मपूर–उधना गाडीला दैनंदिन स्वरूप मिळावे, यासाठी पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रलचे डीआरयूसीसी सदस्य तथा धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र शिवराज कोठारी यांनी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. वाढती प्रवासी संख्या, आरक्षणासाठी होणारी गर्दी आणि खांदेशातील नागरिकांची मागणी याबाबत त्यांनी रेल्वे बोर्डासह संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर रेल्वे बोर्डाने दैनंदिन सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली.
खान्देशसह चार राज्यांतील प्रवाशांना फायदा
ब्रह्मपूर–उधना गाडीला दैनंदिन गाडी सोडण्याच्या निर्णयामुळे धरणगाव, अमळनेर, जळगाव, भुसावळ, नंदुरबार तसेच संपूर्ण तापी पट्ट्यातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे नागरिक, धार्मिक यात्रेकरू तसेच ओडिशा व आंध्र प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अधिक सोयीची ठरणार आहे. गुजरातमधील उधना मार्गे सुरत व इतर औद्योगिक शहरांशीही प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
आरक्षणाचा ताण कमी होणार
दररोज सेवा सुरू झाल्यानंतर आरक्षणाचा ताण कमी होण्यास मदत होईल. प्रवाशांना प्रवासासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागणार नाही. उद्योग, व्यापार, शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनांनी म्हटले आहे. या निर्णयाबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, खासदार स्मिता उदय वाघ, रेल्वे बोर्ड, पश्चिम रेल्वे तसेच ईस्ट कोस्ट रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. लवकरच १९०२१/१९०२२ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेसचे नियमित दैनंदिन वेळापत्रक जाहीर होणार असून, त्यानंतर या मार्गावरील प्रवाशांना वर्षभर अखंड आणि नियमित रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.
