नाशिक – भगूर शहरातील नमो उद्यान प्रकल्पाच्या कामावरून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. भगूर परिसरात नमो उद्यान प्रकल्पाचे काम सुरू असताना जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा कठोर आणि स्पष्ट इशारा नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी दिला आहे.
शहराच्या विकासाशी संबंधित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत चुकीची माहिती पसरवून प्रशासनाची दिशाभूल करण्याचे प्रकार अत्यंत गंभीर असून, त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असा इशारा बलकवडे यांनी दिला.
सध्या भगूर येथे नमो उद्यानाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने आणि वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प नागरिकांसाठी विरंगुळा, पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरणार आहे. मात्र, या विकासकामाला अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने शहर प्रमुख विक्रम सोनवणे आणि शिवसेना गटनेते शंकर करंजकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मंत्रालय स्तरावर चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देत पत्रव्यवहार केल्याची बाब समोर आली आहे. पत्रव्यवहारात नमो उद्यानासाठी निश्चित करण्यात आलेली जागा ही एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) साठी आरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. नगराध्यक्षा बलकवडे यांनी या दाव्याला ठामपणे फेटाळून लावत, ही माहिती पूर्णपणे चुकीची, आधारहीन आणि दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट केले आहे. या खोट्या माहितीच्या आधारे केवळ नमो उद्यानाचे काम थांबवण्याचाच नव्हे, तर मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या एसटीपी प्रकल्पालाही अडथळा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
यापूर्वीही शिवसैनिकांच्या सत्तेत स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर उद्यानाचा प्रकल्प तब्बल २५ वर्षे प्रलंबित ठेवण्यात आल्याचा संदर्भ देत, शहराच्या प्रगतीला अडथळा आणण्याची शिवसेनेची हीच मानसिकता पुन्हा दिसून येत असल्याची टीका करण्यात आली. विकासकामांबाबत राजकारण करून नागरिकांच्या हिताशी खेळ करणे अत्यंत निषेधार्ह आहे, असे त्यांनी नमूद केले.
कायदेशीर कारवाईचा इशारा…
भगूर शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, नमो उद्यानासारखे प्रकल्प नागरिकांच्या हितासाठीच राबवले जात आहेत. त्यामुळे अशा कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्ती किंवा गटांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.शहराच्या विकासाच्या आड येणारी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे आणि विकासकामांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केले आहे.
