‘केबीसी’ घोटाळ्यात गुंतवणूकदारांची शेकडो कोटींची फसवणूक करत सिंगापूरला पळालेला मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती यांना शुक्रवारी सकाळी मुंबई विमानतळावर नाशिक पोलिसांनी अटक केली. जवळपास दोन वर्षे हे संशयित परदेशात ठाण मांडून होते. या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अडीच वर्षांत तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवत ‘केबीसी’ कंपनीने राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली. भाऊसाहेब चव्हाणने या कंपनीची स्थापना केली होती. पत्नी आरती, भाऊ बापूसाहेब, शालक संजय जगताप (निलंबित पोलीस कर्मचारी) अशा निकटच्या नातेवाईकांच्या मदतीने त्याने विविध साखळी योजनांद्वारे गुंतवणूकदारांना करोडपती बनविण्याचे स्वप्न दाखविले. ठिकठिकाणी दलाल नेमून आणि भव्यदिव्य मेळाव्यांचे आयोजन करत ‘केबीसी’ने सर्वसामान्यांना जाळ्यात ओढण्याचे काम केले. त्यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जुलै २०१४ पासून गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. आतापर्यंत आठ हजार तक्रारदारांनी जिल्ह्य़ात तक्रारी दिल्या असून संबंधितांची फसवणूक झालेली रक्कम २१० कोटींच्या घरात आहे. राज्यातील इतर भागांतही केबीसीच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. तत्पूर्वीच, भाऊसाहेबने पत्नीसह परदेशात पलायन केले. हे दोघे वगळता उर्वरित संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यातील चार जण अद्याप कारागृहात आहेत.

दरम्यानच्या काळात सिंगापूर येथे असणाऱ्या भाऊसाहेबला भारतात आणण्यासाठी पोलीस ‘इंटरपोल’च्या मदतीने प्रयत्न करत होते. ‘केबीसी’च्या संचालकांची सुमारे ८० कोटींची स्थावर मालमत्ता व बँक खात्यातील रक्कम जप्त करण्यात आली. या घोटाळ्यात नाडल्या गेलेल्या माय-लेकासह सहा ते सात जणांनी या काळात आत्महत्या केली तर एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. दोन वर्षे परदेशात ठाण मांडून बसलेला भाऊसाहेब अचानक भारतात कसा आला याची स्पष्टता झाली नाही. नाशिक पोलिसांनी सकाळी सहा वाजता भाऊसाहेब व त्याच्या पत्नीला मुंबई विमानतळावर अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिली. शनिवारी संबंधितांना न्यायालयात हजर केले जाणार असून त्यांच्या मालमत्तेचा शोध घेतला जाणार असल्याचे जगन्नाथन यांनी सांगितले.