नाशिक – जिल्ह्यातील अनेक भागांत रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहादा–प्रकाशा–विंचूर राष्ट्रीय महामार्गावरील भावडबारी घाट पुढील ४८ तासांसाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, या मार्गावरील वाहतूक देवळा शहरातील पाचकंदील येथून मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गाकडे पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
सटाणा–देवळा–मंगरूळ राष्ट्रीय महामार्गावरील भावडबारी घाट ४८ तास बंद ठेवून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केली होती. त्यानंतर तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून आवश्यक आदेश देण्याची विनंती केली. भावडबारी घाटाचे काँक्रिटीकरण व विस्तारीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या कामादरम्यान घाटात मोठ्या प्रमाणावर कटिंग करण्यात आल्याने अनेक दगड सैल झाले आहेत. जून महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या पावसात घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. आता हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पुन्हा दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने तातडीने आदेश जारी करत भावडबारी घाटातील वाहतूक सलग दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत वाहतूक देवळा शहरातील पाचकंदील येथून मालेगाव नाका, पिंपळगाव वाखारी, मेशी फाटा, धोबी घाट, खारी फाटा, देवळा फाटा मार्गे मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आली असल्याची माहिती अपर जिल्हा न्यायदंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आवश्यक दिशादर्शक फलक व वाहतूक सूचना फलक तातडीने उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिसांनी रात्रीच घाटाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी बॅरिकेड्स उभारून वाहतूक बंद केली. पुढील दोन दिवस वाहनचालकांनी भावडबारी घाटातून प्रवास टाळून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वाहतूक खर्च वाढणार; टोल माफीची मागणी
पर्यायी मार्गाचे अंतर अधिक असल्याने वाहनधारकांचा इंधन व प्रवास खर्च वाढणार आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांना चांदवडजवळील टोलनाक्यावर टोलमाफी द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंच आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांनी केली आहे. तसेच, ही वाहने देवळा येथून पर्यायी मार्गाने आली असल्याचे स्पष्ट होण्यासाठी मालेगाव चौफुली येथे वाहनांना मोफत पास देण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.
