नाशिक – पावसाळी वातावरणात नाशिक जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळे सर्वानाच आकर्षित करतात. त्यातही धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात तर निसर्ग पर्यटनाला बहर येतो. नाशिक जिल्ह्यासह मुंबई, पुण्याचे पर्यटक आवर्जुन इगतपुरी तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी येतात. पावसाळ्यात इगतपुरी तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांचे आवडते ठिकाण म्हणजे भावली धरण.
भावली धरणाच्या आजूबाजूला डोंगर असल्याने डोंगरांच्या कुशीतील हे धरण पर्यटकांना कायमच आकर्षित करते. परंतु, या परिसरात घडणाऱ्या काही घटना पर्यटकांना सावधान करीत आहेत. त्यामुळेच भावली धरण परिसरात सहकुटुंब पर्यटनासाठी येत असाल तर सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा फायदा निश्चितच गरजू स्थानिक मंडळींना होत आहे. परंतु, त्यातही काही गुंड प्रवृत्तींकडून पर्यटकांना त्रास देणे सुरु झाले आहे. अशीच एक घटना पुढे आली असून त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भावली धरण आणि धबधबा परिसरात नाशिकमधील एक कुटुंब त्यांच्या मोटारीने रविवारी फिरण्यासाठी गेले होते. भावली धरण परिसरात एका टोळक्याने या कुटुंबातील महिलेची छेड काढली. संबंधित महिलेने आणि तिच्या पतीने याचा जाब विचारल्यानंतर टोळक्याने कुटुंबावर हल्ला केला. यामुळे घाबरुन त्यांनी तेथून निघून जाणे सोईस्कर समजले. गुंडांनी या कुटुंबाच्या मोटारीचा सुमारे १५ किलोमीटरपर्यंत पाठलाग करुन मोटारीवर हल्ला केला. टोळक्याकडे लाकडी दांडके आणि लोखंडी गज होते. हल्ल्यात गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. सदर कुटुंब नाशिकमध्ये पोहचल्यावर त्यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नेमका प्रकार काय घडला ?
गुंडांनी कुटुंबावर हल्ला केलेल्या प्रकरणाविषयी या महिलेने माध्यमांना माहिती दिली. ” भावली धरणावर फिरण्यासाठी घरातील आठ जण गेलो होतो. परतत असताना दोन जणांनी मला छेडले.. मी याबाबत जाब विचारला. माझ्या पतीनेही त्यांना ही सार्वजनिक जागा आहे, तुम्हांला काही कळते का, असे समजावले. त्यानंतर दोघांनी शिवीगाळ केली. अंगावर धावून आले.
आम्हीही प्रतिकार केला. त्यामुळे ते निघून गेले. त्याठिकाणी उभ्या असेलल्या टेम्पोजवळ आठ ते दहा जण उभे होते. ते आमच्या दिशेने आले. आमच्या माणसांना का मारले, असे त्यांनी दरडावले. त्या लोकांनीही आम्हांला शिवीगाळ केली. प्रकरण मिटवून आम्ही तिथून निघाल्यानंतर ते लोक पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले. आणि आमच्या गाडीच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. आम्ही निघालो असता सुमारे पंधरा किलोमीटरपर्यंत त्यांनी पाठलाग केला. गज आणि लाकडी दांड्याने गाडीवर हल्ला करण्यात आला” अशी माहिती या महिलेने दिली. या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
