भोंदू बाबास दाभाडीत अटक

बाबा करीत असलेल्या दाव्यासंदर्भात उलटतपासणी घेण्याचा प्रयत्न केला असता तो गोंधळला

(संग्रहित छायाचित्र)

छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मालेगाव :  गुढी पाहणे आणि तंत्र—मंत्राद्वारे चमत्कार करण्याचा दावा करत लोकांना फसविणाऱ्या तालुक्यातील दाभाडी येथील रोकडोबा वस्तीवरील आबा भगत या  भोंदू बाबास छावणी पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन समितीच्या सहकार्याने अटक केली आहे.

मंतरलेल्या राखेच्या पाण्याद्वारे दारु सोडविणे, मूलबाळ न होणाऱ्या जोडप्यांना संततीप्राप्तीचे सुख मिळवून देणे तसेच सर्व प्रकारचे आजार आणि कोंटुंबिक अडचणी दूर करण्याचा दावा करत या बाबाने काही दिवसांपासून रोकडोबा वस्तीजवळ अंधश्रद्धेचा बाजार मांडलेला होता. गुरुवारी या ठिकाणी या भोंदूसह अन्य १५ ते २० जणांनी धिंगाणा सुरु के ल्याची माहिती वस्तीवरील काही नागरिकांनी अमोल निकम यांना भ्रमणध्वनीवरून दिली. त्यांनी छावणी पोलीस आणि समितीचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांना यासंदर्भात माहिती दिली.

अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण वाढिले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली असता बाबा आणि त्याचे १५ ते २० साथीदार स्थानिक नागरिकांशी अरेरावी करीत असल्याचे आढळून आले.

पोलीस आल्याचे लक्षात येताच या बाबाच्या साथीदारांनी तेथून पळ काढला. बाबा पोलिसांच्या तावडीत सापडला.

यावेळी समितीचे अध्यक्ष शिंदे यांनी हा बाबा करीत असलेल्या दाव्यासंदर्भात उलटतपासणी घेण्याचा प्रयत्न केला असता तो गोंधळला. तसेच आपला फोलपणा उघड झाल्याचे दिसू लागताच गयावया करू लागला. पोलिसांनी घटनास्थळावरून काही साहित्य जप्त केले.

तसेच त्याच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जितेंद्र वाघ, निरंकार निकम, वसंत मोरे, शेखर पवार, गणेश निकम या स्थानिकांनी यासाठी सहकार्य केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bhondu baba arrested in dabhadi zws

ताज्या बातम्या