नाशिक – संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु असून प्रारंभी एसआयटीला विशेष माहिती न देणारा खरात आता धडाधड बोलू लागल्याचे समोर आले आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली अशोक खरातने एसआयटीकडे दिली असून महिलांना फसविणे कसे सहजशक्य आहे, हेच त्याने या कबुलीतून दाखवून दिले आहे. महिलांना  जाळ्यात ओढण्यासाठी कोणताही दैवी चमत्कार केला नसल्याचे स्पष्ट करतानाच दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए, असेही त्याने सांगितल्याचे पुढे आले आहे.

महिलांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरातविरुध्द दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. आता खरातच्या मागे सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) चा ससेमिरा लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच  खरातच्या मालमत्तेवर करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत माहिती दिली होती. खरातच्या संपत्तीची आणि बँकेच्या व्यवहाराची सगळी माहिती एसआयटीकडे आहे. त्यानंतर आता ईडीकडून खरातच्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे. त्याने अनेक पतसंस्था आणि बँकांमध्ये आर्थिक व्यवहार केले आहेत. या पतसंस्था आणि बँकामधून त्याने कोट्यवधींचे व्यवहार केले असून, हे सर्व व्यवहार संशयास्पद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते.

महिलांवरील अत्याचार प्रकरणात अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याच्या कोट्यवधींच्या व्यवहारावं आता तपास यंत्रणांकडून लक्ष दिले जात आहे.  नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मालमत्ता तसेच  बँकांच्या १३२ खात्यांमधील कोट्यवधींच्या व्यवहारांचा त्यात समावेश आहे. जगदंबा पतसंस्थेत ३२ तर समता पतसंस्थेत १०० खाती अशी सापडली आहेत की ज्यात वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव आहे.. या १३२ खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात पुढे आले आहे. मुख्यमंत्र्यांनी ईडी चौकशीची घोषणा केल्यानंतर लगेचच खरातविरुध्द ईडीचा पहिला गुन्हा दाखल झाला.

एसआयटी चौकशीत खरातने दिलेल्या कबुलीत अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत.  कोणताही चमत्कार, वशीकरण नव्हे तर केवळ हातचलाखीने महिलांना भीती दाखवून त्यांचे  शोषण केल्याची कबुली अशोक खरातने दिल्याचे सांगण्यात येते.  दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असेही तो म्हटल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अशोक खरातची मुलगी तृप्ताबालाचीही मंगळवारी एसआयटी चौकशी होण्याची शक्यता आहे. तृप्ताबालाच्या नावावर अशोक खरातने कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात पुढे आले आहे. नाशिकमध्ये खरात कुटुंबिय राहत असलेल्या बंगल्याचे नावही तृप्ताबाला आहे. अशोक खरातची पोलीस कोठडी बुधवारी संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.