नाशिक – महिला लैंगिक शोषण प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) सर्व दृष्टीकोनातून तपास करीत असले तरी काही प्रश्नांची उत्तरे अजून त्यांनाही मिळालेली नाहीत. तुर्तास पथकाने अत्याचार प्रकरणाशी संबंधित पुरावे, साहित्य, दस्तावेज, डिजिटल पुरावे संकलन, जबाब यावर संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे भोंदूबाबाशी संबंधित राजकीय व इतर मंडळींपर्यंत तपास पोहोचला नसल्याचे सांगितले जाते. आतापर्यंतच्या तपासात भोंदूबाबा एकटाच सर्व कृत्य करीत होता. त्याच्या साथीदारांचा थांगपत्ता लागलेला नाही. भोंदूबाबा काही माहिती दडपत असल्याने ती मिळवण्याचा एसआयटीचा प्रयत्न आहे.
राजकीय नेत्यांचे भविष्य कथन आणि सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिराची उभारणी याद्वारे धार्मिक व राजकीय क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या खरातविरोधात महिला अत्याचार, बनावट रत्नांची विक्री, अवतार पूजेच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक असे नाशिकमध्ये १० गुन्हे दाखल आहेत. पहिल्या गुन्ह्यात त्याला संपूर्ण १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती.
दुसऱ्या गुन्ह्यात आठ एप्रिलपर्यंत तो पोलीस कोठडीत राहणा आहे. या प्रकरणात एसआयटीला अजूनही भोंदूबाबा पीडितेला मंतरलेले जे पाणी देत होता, त्यात कोणता पदार्थ मिसळत होता, हे शोधता आलेले नाही. न्यायालयात खुद्द एसआयटीने ही बाब मांडली. दैवी शक्ती असल्याचा दावा करून, मंत्र-तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली भोंदूबाबाचे जे गैरप्रकार समोर आले, त्यात त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का, याचा शोध घेतला जात आहे. एसआयटीतील एका अधिकाऱ्याने आतापर्यंतच्या तपासात गुन्ह्यात खरातचा एकट्याचाच सहभाग निष्पन्न झाल्याचे सांगितले.
खरातने श्री शिवनिका संस्थानच्या माध्यमातून ईशानेश्वर मंदिर उभारले. या संस्थानमध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर, सिन्नर (स्टाईस) सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष नामकर्ण आवारे, पुण्यातील सनदी लेखापाल ललित फोफळे, उपाध्यक्षपदी राजेंद्र घुमरे, सुभाषराव गमे यांचा समावेश होता. यातील काही सदस्यांनी मध्यंतरी राजीनामे दिल्याचे सांगितले गेले. ईशानेश्वर मंदिरात अनेक मंत्री व सर्वपक्षीय बड्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पूजा केली होती.
परंतु, संस्थानचे विश्वस्त, खरातच्या संपर्कातील मंत्री आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली नसल्याचे सांगितले जाते. या संदर्भात एसआयटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वेगवेगळ्या दृष्टीकोनातून तपास प्रगतीपथावर असल्याचे नमूद केले. एसआयटीने लैंगिक शोषण प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासास प्राधान्य दिले आहे. त्या अनुषंगाने विविध माहिती, पुरावे जमविले जात आहेत. अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदविले गेले. खरात काही गोष्टींची माहिती देत नाही. काही बाबी लपवत आहे. या स्थितीत खरातशी हितसंबंधियांची माहिती घेण्याचे काम सुरू असून त्यांच्या चौकशीची कारवाई सुरू झाली नसल्याला संबंधित अधिकाऱ्याने दुजोरा दिला.
