नाशिक – महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातशी संपर्कात राहणे, सिन्नरच्या ईशानेश्वर मंदिरात पूजा-विधी करणे आणि राजकीय भविष्य जाणून घेण्यावरून राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना भोंदूबाबाच्या मुलीच्या लग्नपत्रिकेतील प्रमुख पाहुण्यांच्या यादीवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

खरातच्या मुलीचे लग्न अलीकडेच नाशिक-मुंबई महामार्गावरील अलिशान रिसॉर्टमध्ये झाले. त्यास जवळचे नातेवाईक वगळता सिन्नरमधील फारसे कुणाला निमंत्रण नव्हते. या सोहळ्यात अतिशय मातब्बर राजकीय मंडळी, वरिष्ठ शासकीय अधिकारी अशा काही मोजक्याच मंडळींची उपस्थिती राहिल्याचे सांगितले जाते.

राजकीय नेते मंडळींचे भविष्य कथन, बनावट रत्न आणि हिऱ्यांची विक्री, अघोरी पूजा, महिलांचे लैंगिक शोषण अशा अनेक कारस्थानांनी प्रकाशझोतात आलेल्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातने भोंदूगिरीतून शेकडो कोटींची मालमत्ता जमवल्याचे तपासात उघड झाले.

भोंदूबाबाने भक्तांकडून मर्सिडिज सारख्या किंमती गाड्याही घेतल्या. राजकीय वर्तुळात त्याने आपले वलय निर्माण केले. नाशिक, अहिल्यानगर, नवी मुंबई आदी ठिकाणी शेकडो कोटींची मालमत्ता जमवणाऱ्या भोंदूबाबाने आपल्या मुलीचे लग्न अतिशय थाटात केले होते. नाशिक येथे महामार्गावरील रायगडनगर येथील मॅस्टिक सिलेक्ट रिव्हिएरा रिसॉर्टमध्ये निवडक मातब्बरांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात हा सोहळा वैदिक विवाह पद्धतीने पार पडला होता. दोन दिवस संपूर्ण रिसॉर्ट भोंदूबाबाने आरक्षित केले होते.

लग्नपत्रिकेत प्रमुख पाहुण्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री आशिष शेलार, महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर, ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नावांचा उल्लेख आहे. मुख्यमंत्री असताना शिंदे हे एकदा मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिरात पूजेसाठी गेले होते. केसरकर तर अनेक कार्यक्रमात भोंदूबाबा खरातसोबत असल्याची छायाचित्रे समाजमाध्यमातून प्रसारित झाली.

खरातशी नियमित संपर्कात राहणाऱ्यांचे नेमके कोणते संबंध होते, असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. केसरकर आणि चाकणकर यांंचे खरातशी आर्थिक संबंध असू शकतात, अशी साशंकता उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिक दौऱ्यात व्यक्त केली होती. त्यांनाही चौकशीच्या कक्षेत आणण्याची मागणी होत आहे.

केसरकर यांनी खरातला महाराष्ट्रातील ३९ आमदार भेटले होते, परंतु, आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले होते. संशयित खरातचे कोणकोणत्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे होते, याची स्पष्टता एसआयटीकडून अद्याप झालेली नाही. खरातच्या भ्रमणध्वनीत सांकेतिक नावाने असलेल्या संपर्कातील सर्व व्यक्तींची पडताळणी होत आहे.