नाशिक: विवाहितेचे सातत्याने लैंगिक शोषण करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरात याला जिल्हा व सत्र न्यायालयाने आठ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयिताने एका बाटलीत ‘दिव्य जडीबुटी’चे औषध भरून एका व्यक्तीला देण्यासाठी पीडितेकडे दिले होते. हे औषध नेमके कोणते होते आणि गर्भपातासाठी संशयिताने तिला कोणत्या गोळ्या दिल्या होत्या, याचा शोध आता विशेष तपास पथक (एसआटी) घेणार आहे.
महिला अत्याचार प्रकरणी दाखल पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या खरातला दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीने अटक केली. गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हजर करण्यात आले. मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एन. इचपुराणी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी एसआयटीचे तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी आणि सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे नमूद केले.
संशयिताने पीडितेवर फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२६ या कालावधीत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. पीडितेला व तिच्या मुलांना भविष्याची भीती घालून, धार्मिक विधीच्या नावाखाली तिचे शारीरिक शोषण करण्यात आले. ती गर्भवती राहिल्यानंतर औषध देऊन तिचा गर्भपात करण्यात आला. २४ जानेवारी २०२६ रोजी संशयिताने पीडितेला एका बाटलीत दिव्य जडीबुटीचे औषध दिले होते. त्यातील अर्धे द्रव्य एका व्यक्तीला देण्यास सांगून त्याबदल्यात साडेबारा हजार रुपये घेतले होते. बाटलीतील उर्वरित हिरव्या मळकट रंगाचे द्रव्य पोलिसांनी जप्त केले आहे. हे औषध कोणते होते, खरात त्याचा वापर कशासाठी करायचा, ते कोणाकडून मिळवले आणि कसे तयार केले, याबाबत सखोल तपास करणे आवश्यक असल्याचे मुद्दे सरकारी पक्षातर्फे मांडण्यात आले.
दैवी शक्ती असल्याचा बहाणा करून, मंत्र-तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली खरातने आणखी काही गैरप्रकार केले आहेत का किंवा यात त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करण्यासाठी खरातला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. याला बचाव पक्षाचे वकील अॅड. सचिन भाटे यांनी विरोध केला. तपास यंत्रणेने दिलेली कारणे पहिल्या गुन्ह्याच्या तपासात आधीच समाविष्ट होती, असा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर भोंदूबाबा खरातला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आधारकार्ड, पॅनकार्ड आणि छायाचित्रे का घेतली?
संशयित अशोक खरातने पीडितेकडून तिच्यासह आई-वडील व भाऊ अशा चार जणांची आधारकार्ड, पॅनकार्ड व छायाचित्रे घेतली होती. ही कागदपत्रे घेण्यामागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याचा संशयिताने काय उपयोग केला, याचा तपास केला जाणार असल्याचे एसआयटीने म्हटले आहे. खरात अनेक महिलांना ‘मंतरलेले पाणी’ पिण्यासाठी देत असे. या पाण्यात तो नेमका कोणता पदार्थ मिसळत होता, याचाही शोध आता पोलीस घेत आहेत.
