नाशिक : महानगरपालिकेत भाजपच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे विषय मार्गी लावले गेले. काही कामे प्रगतिपथावर आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अडीच वर्षांत नाशिकला किती निधी दिला, कोणत्या योजना मार्गी लावल्या याची स्पष्टता करावी, असे आव्हान देत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आगामी निवडणुकीत मतदार भुजबळांना उत्तर देतील, असा इशारा दिला.
पालकमंत्री भुजबळ यांच्या निर्देशानुसार भाजपच्या कार्यकाळात मंजूर झालेले उड्डाण पूल, आयटी पार्क, दादासाहेब फाळके स्मारकाचे नूतनीकरण आदी खर्चीक विषयांवर फुली मारली जाणार आहे. तसेच तब्बल ८०० कोटींच्या भूसंपादनाच्या मार्गी लावलेल्या प्रस्तावांमध्ये कुणाचे स्वारस्य होते याची छाननी करण्यात येणार आहे. या घटनाक्रमावर बुधवारी शहरात आलेल्या महाजन यांनी भाष्य केले. भाजप जैन प्रकोष्ठच्या वतीने आयोजित कर्करोगमुक्त महाराष्ट्र अभियानच्या ५१ व्या शिबिराचे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते तर, भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर पत्रकार परिषदेत महाजनांनी मुख्यमंत्र्यांसह, खा. संजय राऊत, भुजबळांच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडले.
राष्ट्रवादीचे महापालिकेत केवळ सहा नगरसेवक होते. त्यामुळे भुजबळांना कधी तिथे जाता आले नव्हते, असा टोला त्यांनी लगावला. प्रशासक नियुक्तीनंतर ते तिथे गेले. काही कामांची चौकशी आणि आयटी पार्कसारखे काही प्रकल्प थांबवण्याची सूचना त्यांनी केल्याचे समजले. भाजपने पाच वर्षांत पथदीप, पाणीपुरवठा, घनकचरा, गटार व्यवस्था असे सर्व विषय हाताळले. निओ मेट्रो प्रकल्प मंजूर झाला. मनपाची बस सेवा सुरू झाली. अशी अनेक चांगली कामे केल्याचा दावा महाजनांनी केला. भुजबळांना त्याचे उत्तर निवडणुकीत मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेला अडीच वर्षे झाली. या काळात भुजबळांनी काय केले, नाशिकला किती निधी दिला, कोणत्या योजना मार्गी लावल्या, अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. आगामी निवडणुकीत नाशिककर भाजपला कौल देतील. गतवेळेपेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांना गांभीर्य नाही
भोंग्याच्या मुद्यावरून शासनाने सर्वपक्षीय बैठक बोलावली. ज्या विषयावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्या महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री आले नाहीत. आजवरच्या राजकीय जीवनात असा मुख्यमंत्री बघितला नाही. त्यांना महत्त्वाच्या विषयांचे गांभीर्य नसल्याचा आक्षेप महाजन यांनी घेतला. घरी बसून ते केवळ आभासी प्रणालीवर बोलतात. मुख्यमंत्री ज्या बैठकीला येत नाहीत, तिथे विरोधी पक्षाकडून का अपेक्षा ठेवतात, असा प्रश्नही त्यांनी केला. भोंग्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी भाजपची भूमिका आहे. शिवसेनेच्या सर्व भूमिका बदलल्या असून खुर्चीसाठी ती लाचार झाली आहे. खा. संजय राऊत मनात येईल ते बोलतात. त्यांचा भोंगा अव्याहतपणे सुरू असतो, त्यांच्या बेताल बडबडीला नागरिक वैतागले असल्याकडे महाजन यांनी लक्ष वेधले. पोलीस संरक्षणात विरोधात बोलणाऱ्यांवर हल्ले होत आहेत. त्या अनुषंगाने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे दाद मागितली. खासदार नवनीत राणा यांची सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील वागणुकीबद्दल तक्रार आहे. तेथील कॅमेरे तपासून सत्यता समोर आणावी. खासदार राणा यांचे दाऊदच्या हस्तकांशी आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपांबाबत त्यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. नियमात बसत असेल तर ईडी चौकशी करेल. मनसे आणि भाजपचे तत्त्व, भूमिका वेगळी आहे. आम्ही मनसेसोबत जाऊ असे म्हटलेले नसल्याचे महाजन यांनी नमूद केले.