त्र्यंबकेश्वरमध्ये काळे झेंडे फडकावून निषेध; स्थानिकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी स्वराज्य महिला संघटनेनंतर शुक्रवारी पहाटे तृप्ती देसाईंसह भूमाता ब्रिगेडच्या चौघींनी पोलीस बंदोबस्तात त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. स्थानिकांनी दोन दिवसातील घडामोडींच्या निषेधार्थ घरांवर काळे झेंडे लावले. महिलांच्या मंदिर प्रवेशावरून झालेल्या वादात स्थानिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी विश्वस्तांनी केली आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस बंदोबस्त तसेच महिला सुरक्षारक्षकांच्या वेढय़ात मंदिराने दिलेल्या अटीशर्तीनुसार साडी परिधान करत गर्भगृहात प्रवेश करून दर्शन घेतले. लागोपाठ दोन दिवसांच्या घडामोडींमुळे ग्रामस्थांचा पारा अधिकच वाढला. या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी घरांवर काळे झेंडे लावण्यात आले. स्थानिक महिला पहाटे पाचपासून दर्शनासाठी रांगेत उभ्या असताना देसाई यांना देवस्थान तसेच पोलीस प्रशासनाकडून विशेष वागणूक दिली गेल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. रोज उठून कोणीतरी दर्शनासाठी वाद घालत असून केवळ प्रसिद्धीसाठी हा खटाटोप असल्याची टीका स्थानिक महिलांनी केली. विश्वस्त अॅड. श्रीकांत गायधनी यांनी त्र्यंबकेश्वर प्रश्नी आंदोलनकर्त्यां महिलांनी स्थानिकांच्या भावना समजून घेणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. विचारांच्या आदानप्रदानातून काही तोडगा निघू शकला असता. एवढा आटापिटा, यंत्रणा कामाला लावत अट्टहासाने जे दर्शन घेतले गेले, त्यामुळे अट्टहास दर्शनाचा होता की जिंकण्याचा असा प्रश्न पडतो. तसेच, ज्या मुद्दय़ांवरून स्थानिकांवर गुन्हे दाखल केले ते मंदिर प्रवेशानंतर मागे घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. याआधीही आपण गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अयशस्वी झाला. आज त्याच मंदिरात सन्मानाने दर्शन घेता आले याचा आनंद आहे. ही लढाई स्त्रीला घटनेने दिलेल्या अधिकारांसाठी शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यापासून सुरू झाली आहे. कोल्हापूरनंतर आता त्र्यंबकेश्वरमध्येही महिलांना प्रवेश मिळण्यास सुरुवात झाली आहे. पुढील टप्प्यात हाजी अली दर्गाह आणि दाक्षिणात्य मंदिरांमध्ये प्रवेशासाठी आमचा लढा सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत सर्व प्रार्थनास्थळांमध्ये महिलांना सहज प्रवेश मिळण्यासाठी विशेष कायदा करण्याची मागणी करणार आहे. -तृप्ती देसाई, अध्यक्ष, भूमाता ब्रिगेड