जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध नवीन रेल्वे मार्ग आणि विद्यमान मार्गांच्या विस्ताराची कामे सध्या हाती घेण्यात आली आहेत. जळगाव–मनमाड चौथा रेल्वे मार्ग, पाचोरा–जामनेर–बोदवड ब्रॉडगेज मार्ग, भुसावळ–खंडवा तिसरा व चौथा रेल्वे मार्ग, तसेच जळगाव–जालना आणि धुळे जिल्ह्यातील मनमाड ते इंदूर रेल्वे मार्गामुळे उत्तर महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग हा पश्चिम भारताला मध्य आणि पूर्व भारताशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. जळगाव, भुसावळ आणि मनमाड ही प्रमुख रेल्वे जंक्शन स्थानके या विभागातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जातात. या मार्गांवरून दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी आणि मालाची वाहतूक होत असल्याने अतिरिक्त रेल्वे मार्गांची गरज वाढली आहे. नवीन मार्गांमुळे वाहतुकीचा ताण कमी होऊन रेल्वे गाड्यांचे संचालन अधिक सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.
विविध मार्गांचा असा विस्तार
जळगाव–मनमाडदरम्यान सुमारे १६० किलोमीटर लांबीचा तिसरा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर आता सुमारे २,५७४ कोटी रुपयांच्या निधीतून चौथा मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे. या मार्गामुळे मुंबईकडून उत्तर आणि पूर्व भारताकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. जवाहरलाल नेहरू बंदर आणि प्रस्तावित वाढवण बंदराशी रेल्वे संपर्क अधिक सक्षम झाल्यास मालवाहतुकीलाही फायदा होऊ शकतो. याशिवाय भुसावळ–खंडवा दरम्यान सुमारे १३१ किलोमीटर अंतरात तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग उभारण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३,२८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जळगाव ते भुसावळ दरम्यान पाचवा रेल्वे मार्ग उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे.
पाचोरा–बोदवडमुळे पर्यायी सुविधा
पाचोरा–जामनेर मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून बोदवडपर्यंत विस्तार करण्याच्या कामानेही आता गती घेतली आहे. सुमारे ८४ किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी पीएम गतिशक्ती योजनेंतर्गत सुमारे ९५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते. हा मार्ग विकसित झाल्यास परिसरातील रेल्वे संपर्क मजबूत होण्याबरोबरच भुसावळ–मनमाड दरम्यानच्या व्यस्त मार्गावरील माल वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे कृषी माल आणि औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
जळगाव–जालना मराठवाड्याशी जोडणी
सुमारे १७४ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित जळगाव–जालना रेल्वे मार्गासाठी ५,८०४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असल्याची माहिती आहे. या मार्गामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी, कापूस आणि इतर शेतीमालाची, तसेच जालना जिल्ह्यातील औद्योगिक उत्पादनांची वाहतूक अधिक कार्यक्षमतेने करता येऊ शकते. विद्यमान रेल्वे जाळ्याशी योग्य जोडणी झाल्यास गुजरात, राजस्थान आणि दक्षिण भारताच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीसाठीही हा मार्ग उपयुक्त ठरू शकतो.
धुळ्याच्या विकासालाही चालना
धुळे जिल्ह्यातील बोरविहीर–नरडाणा, मनमाड–धुळे आणि नरडाणा–इंदूर या प्रस्तावित रेल्वे मार्गांमुळे जिल्ह्याचा रेल्वे संपर्क विस्तारण्याची अपेक्षा आहे. बोरविहीर–नरडाणा या सुमारे ५१ किलोमीटर मार्गासाठी १,१७१ कोटी रुपये, तर मनमाड ते न्यू धुळे आणि नरडाणा ते इंदूर या एकत्रित सुमारे ३०९ किलोमीटर मार्गांसाठी सुमारे १६,३२१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. पैकी काही कामांना गती सुद्धा मिळाली आहे. हे मार्ग पूर्ण झाल्यास महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील दळणवळणही अधिक सुलभ होऊ शकेल.
