जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भादली–जळगाव दरम्यानच्या पाचव्या रेल्वे मार्गाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत भादली स्थानकातील यार्डाची पुनर्रचना, नवीन रेल्वे मार्गाची जोडणी आणि सिग्नल यंत्रणेतील आवश्यक बदल करण्यासाठी १२ ऑगस्ट रोजी नॉन-इंटरलॉकिंगचे महत्त्वाचे तांत्रिक काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्याने काही रेल्वे गाड्या पूर्णपणे रद्द, काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर अनेक गाड्या विलंबाने धावणार आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, भादली स्थानकावरील नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे भविष्यात भुसावळ विभागातील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास, गाड्यांची वक्तशीरता सुधारण्यास तसेच सुरक्षित रेल्वे संचालनासाठी मोठा फायदा होणार आहे. मात्र कामाच्या कालावधीत प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
१४ रेल्वे गाड्या पूर्णपणे रद्द
नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे एकूण १४ गाड्या विविध दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी नंदुरबार–भुसावळ आणि भुसावळ–नंदुरबार पॅसेंजर, नाशिक रोड–बडनेरा आणि बडनेरा–नाशिक रोड विशेष, इगतपुरी–भुसावळ आणि भुसावळ–इगतपुरी मेमू, देवळाली–भुसावळ आणि भुसावळ–देवळाली मेमू, दादर–भुसावळ आणि भुसावळ–दादर विशेष तसेच भुसावळ–कटनी एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत. याशिवाय ११ ऑगस्ट रोजी सुरत–भुसावळ एक्स्प्रेस, तर १४ ऑगस्ट रोजी भुसावळ–सुरत आणि कटनी–भुसावळ एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले
गाडी क्रमांक १७०१९ हिसार–हैदराबाद एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२७१६ अमृतसर–नांदेड एक्स्प्रेस या गाड्या त्यांच्या नियमित मार्गाऐवजी भुसावळ सी केबिन (कॉर्ड लाइन)–अकोला–पूर्णा मार्गे धावतील. त्यामुळे या मार्गावरील काही स्थानकांवरील प्रवाशांनी वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
११ गाड्या एक ते तीन तास विलंबाने
मनमाड–जळगाव, खंडवा–भुसावळ आणि अकोला–जळगाव या विभागांतील वाहतुकीवर परिणाम होणार असून ११ एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन करण्यात आले आहे. या गाड्या एक तास पाच मिनिटांपासून ते तीन तासांपर्यंत विलंबाने धावतील. यामध्ये बेंगळुरू–नवी दिल्ली एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस–गोरखपूर एक्स्प्रेस, यशवंतपूर–हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–आसनसोल एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस–जयनगर एक्स्प्रेस, अमृतसर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, जयनगर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, गोंदिया–कोल्हापूर एक्स्प्रेस, बनारस–हडपसर अमृत भारत एक्स्प्रेस आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल–भगत की कोठी एक्स्प्रेसचा समावेश आहे.
अमृत भारत एक्स्प्रेसची वेळ बदलली
गाडी क्रमांक २२५९० हडपसर–बनारस अमृत भारत एक्स्प्रेस १२ ऑगस्ट रोजी नियोजित वेळेपेक्षा दोन तास ३० मिनिटे उशिराने धावणार आहे. ही गाडी सकाळी ७.५० वाजण्याऐवजी सकाळी १०.२० वाजता हडपसर येथून सुटेल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी एनटीईएस, रेलवन ॲप किंवा भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. नॉन-इंटरलॉकिंगचे हे काम पूर्ण झाल्यानंतर भादली–जळगाव दरम्यान पाचव्या रेल्वे मार्गाची जोडणी अधिक सक्षम होईल. त्यामुळे भविष्यात गाड्यांचा वेग, वेळेचे नियोजन, मालवाहतूक क्षमता आणि रेल्वे संचालनाची सुरक्षितता यामध्ये लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
