लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ शहरात मंगळवारी उच्चांकी ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली असताना, दुसऱ्या दिवशी बुधवारी देखील ४५.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सलग दोन दिवसांपासून तापमानाचा पारा ४५ अंशावर कायम असल्याने शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारनंतर नागरिक घराबाहेर पडताना विचार करू लागले आहेत.
यंदा उन्हाळ्याची तीव्रता नेहमीपेक्षा लवकर जाणवू लागली आहे. एप्रिल महिन्याचा पूर्वार्ध अजून संपला नसताना उष्णतेने कहर केला आहे. मध्य रेल्वेचे जंक्शन तसेच आयुध निर्माणी कारखाना आणि दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रामुळे नावारूपास आलेले भुसावळ अलीकडील काही वर्षात वाढत्या तापमानामुळेही चर्चेत आले आहे.
गेल्या वर्षी उन्हाळ्यात एप्रिलमध्ये भुसावळचे तापमान सर्वाधिक ४५.२ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. तुलनेत यंदाच्या एप्रिल महिन्यात केंद्रीय जल आयोगाने घेतलेल्या नोंदीनुसार, भुसावळमध्ये सुमारे ४५.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या तापमानाने नवीन उच्चांक केला आहे. शहरातील तापमान पाच एप्रिलपर्यंत ४२ अंशापर्यंत होते. मात्र, त्यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारी १२ वाजेनंतर शहरातील रस्ते निर्मनुष्य होऊ लागले आहेत.
अंगाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. उन्हाचा फटका सर्वांना बसत आहे. बाजारपेठेत शुकशुकाट असून अनेकांना उष्णतेमुळे चक्कर येणे, डोकेदुखीचा त्रास होत आहे. दुसरीकडे कुलर, पंखे यांच्या विक्रीत वाढ झाली आहे.उन्हामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. सध्या शेतात तसेच बांधकाम मजूर सकाळीच कामांवर जात असून दुपारी विश्रांती घेतली जात आहे. अनेकांनी घराबाहेर सावलीसाठी हिरव्या रंगाचा पडदा लावला आहे.
सायंकाळी इमारत, घराच्या सज्जावर पाणी टाकत थंडावा मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सकाळ नऊनंतर तापमानातील वाढती दाहकता अनुभवण्यास मिळत असल्याने नागरिक घराबाहेर पडतांना सनकोट, रुमाल आदींचा वापर करत आहेत. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणपोया दिसू लागल्या आहेत. ताक, मठ्ठा, लस्सी, ऊसाचा रस, आईस्क्रिम, थंड पेय यांना मागणी वाढली आहे.
जळगावमध्येही तापमानात वाढ
भुसावळच्या तुलनेत उन्हाचा तडाखा थोडा कमी दिसत असला, तरी जळगावचे तापमान बुधवारी ४३ अंशावर राहिले. मंगळवारी जळगावमध्ये ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली होती. त्यात आणखी वाढ झाल्याने बुधवारी ४३.७ अंश सेल्सिअस तापमान हवामान विभागाच्या वेधशाळेकडून नोंदविण्यात आले.