जळगाव : मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील काही विभागांपैकी जिल्ह्यातील भुसावळ हा एक महत्वाचा विभाग आहे, जो महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील अनेक लहान-मोठे उद्योग, संरक्षण प्रकल्प, ऊर्जा आणि व्यापारी केंद्रांना रेल्वे मार्गे जोडतो. त्यामुळे भुसावळ विभागाला मध्य रेल्वेचा कणा म्हणून ओळखले जाते.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचा भौगोलिक विस्तार महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर आणि खंडवा या जिल्ह्यांपर्यंत असून, लाखो प्रवासी आणि प्रचंड प्रमाणातील माल वाहतुकीसाठी हा विभाग वर्षानुवर्षे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भुसावळ विभागाला पूर्व–पश्चिम वाहतुकीचे प्रमुख केंद्र म्हणूनही ओळख आहे. मुंबईकडून येणाऱ्या रेल्वे मार्गावर इगतपुरी हे प्रवेशद्वार मानले जाते, तर पुढे हा विभाग खंडवा आणि बडनेरापर्यंत विस्तारलेला आहे. सुमारे ७४२ किलोमीटरहून अधिक लांबीच्या रेल्वे मार्गांचे संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन भुसावळ विभागाकडून करण्यात येते. मुंबईसह पुणे, नागपूर, हैदराबाद, दिल्ली, कोलकाता तसेच उत्तर आणि दक्षिण भारतातील अनेक महत्त्वाच्या शहरांना थेट जोडणाऱ्या गाड्या भुसावळ विभागातून धावतात. प्रवासी वाहतुकीसोबतच कोळसा, सिमेंट, धान्य, पेट्रोलियम पदार्थ, खते, स्टील आणि औद्योगिक कच्चा माल यांची मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक या मार्गावरून केली जाते.

देवळालीचे सामरिक महत्त्व

मध्य रेल्वेच्या महत्वपूर्ण स्थानकांपैकी एक देवळाली येथे आर्टिलरी स्कूल तसेच आर्मी एव्हिएशन तळ असल्याने या परिसराला सामरिक महत्त्व प्राप्त झाले आहे. नाशिक परिसरात एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्र कार्यरत असून, यामुळे राज्याच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यात मोठे योगदान दिले जाते. याच भागात इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस असल्याने देशाच्या चलन निर्मितीच्या दृष्टीनेही हा विभाग महत्त्वाचा ठरतो. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि इतरही बऱ्याच आघाडीच्या औद्योगिक उद्योगांमुळे या भागात रोजगार निर्मितीस मोठी चालना मिळाली आहे.

मनमाड– तेल साठवण आणि वितरण

मनमाड हे भुसावळ विभागातील एक अत्यंत महत्त्वाचे जंक्शन असून, येथून मनमाड-दौंड आणि मनमाड-सिकंदराबाद या प्रमुख ब्रांच लाईन्स जोडल्या जातात. या ठिकाणी भारतीय अन्न महामंडळ, केंद्रीय अभियांत्रिकी कार्यशाळा (ब्रीज वर्कशॉप) आणि काँक्रीट स्लीपर फॅक्टरी कार्यरत आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने मनमाडचे स्थान अनन्यसाधारण आहे. पानेवाडी येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचे तेल साठवण डेपो कार्यरत आहेत. यामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यात मदत होते.

भुसावळ– औद्योगिक आणि संरक्षण केंद्र

भुसावळ येथे दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्र, ऑर्डनन्स फॅक्टरी तसेच भुसावळ कॅन्टोन्मेंट (पूर्वीचे रिझर्व्ह पेट्रोलियम डेपो) कार्यरत आहेत. वरणगाव येथेही ऑर्डनन्स फॅक्टरी असून, संरक्षण साहित्य निर्मितीत या भागाचा मोठा वाटा आहे. भादली येथे ओरिएंट सिमेंट फॅक्टरी असल्याने बांधकाम उद्योगाला मोठे बळ मिळते. चाळीसगाव हे धुळे ब्रांच लाईनसाठी महत्त्वाचे जंक्शन स्थानक आहे. पाचोरा येथूनही पाचोरा-जामनेर रेल्वे मार्ग जोडला जातो. जळगाव हे जळगाव-सुरत ब्रांच लाईनला (पश्चिम रेल्वे) जोडले गेले असून, यामुळे महाराष्ट्र-गुजरात व्यापाराला मोठी चालना मिळाली आहे.

पारस ते खंडवा– ऊर्जा, व्यापाराचे जाळे

पारस येथेही औष्णिक वीज निर्मिती केंद्र असून, अंबुजा एक्सट्रॅक्शन मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड सारख्या उद्योगांचे जाळे आहे. अकोला हे खंडवा-अकोला-पूर्णा लाईनवरील महत्त्वाचे जंक्शन असून, ते डाळी आणि अन्नधान्याचे व्यापार केंद्र म्हणून ओळखले जाते. बोरगाव येथे अंबिका सॉल्व्हेक्स आणि सिद्धार्थ सोया लिमिटेड सारखे अन्नप्रक्रिया उद्योग कार्यरत आहेत. याच भागात चित्रपट वितरण केंद्र असल्याने सांस्कृतिक-व्यावसायिक घडामोडींनाही चालना मिळते. नेपानगर येथील नेपा पेपर मिल ही कागद उद्योगातील अग्रगण्य कंपनी आहे. याशिवाय, खंडवा येथे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मोठे वेअर हाऊस आणि खंडवा ऑइल मिल्स कार्यरत आहे. अन्नधान्य साठवण आणि वितरणात या भागाचे योगदान लक्षणीय आहे.