जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने मालवाहतूक क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत नाशिक येथील मेसर्स महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडसाठी भुसावळ गुड्स शेडमधून ऑटोमोबाईल लोडिंगची यशस्वी सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे भुसावळ विभागाच्या मालवाहतूक सेवेत नव्या व्यवसायाची भर पडली असून, रेल्वे मार्गे वाहन वाहतुकीला नवे बळ मिळाले आहे.

जुलै २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या काळात वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन रेल्वे मार्गे होणारी विद्यमान ऑटोमोबाईल वाहतूक टिकवून ठेवणे, त्यात वाढ करणे आणि उद्योगांना अधिक सक्षम वाहतूक पर्याय उपलब्ध करून देणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

पहिल्याच रॅकमधून १०० वाहनांची वाहतूक

भुसावळ गुड्स शेडमधून रविवारी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बेंगळुरू विभागातील निडवंडा स्थानकासाठी पहिली एनएमजी (न्यू मॉडिफाईड गुड्स) रॅक रवाना करण्यात आली. या रॅकमध्ये २५ एनएमजी वॅगन्समध्ये एकूण १०० ऑटोमोबाईल्स कारची सुरक्षित व नियोजनबद्ध लोडिंग करण्यात आली. पहिल्याच वाहतुकीतून मध्य रेल्वेला सुमारे १४ लाख ८२ हजार रुपयांचे मालवाहतूक उत्पन्न मिळाले. भविष्यात अशा प्रकारच्या वाहतुकीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या यशामागे भुसावळ विभागाच्या व्यवसाय विकास खात्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. नवीन ग्राहकांना रेल्वेच्या मालवाहतूक सेवेशी जोडणे, उद्योगांसाठी किफायतशीर वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे आणि नवीन व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी विभागाने सातत्याने पाठपुरावा केला. त्यातूनच महिंद्रा लॉजिस्टिक्ससारख्या मोठ्या ग्राहकाची वाहन वाहतूक रेल्वेमार्गे सुरू करण्यात यश आले.

मालवाहतूक क्षेत्राला मिळणार चालना

भुसावळ विभागातून वाहनांची यशस्वी लोडिंग ही मध्य रेल्वेच्या मालवाहतूक सेवेत विविधता आणण्याच्या धोरणातील महत्त्वाची पायरी मानली जात आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार सेवा उपलब्ध करून देणे, जलद व सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे आणि महसुलाचे नवीन स्रोत विकसित करणे या उद्दिष्टांना या उपक्रमामुळे बळ मिळाले आहे. रेल्वे मार्गे वाहन वाहतूक ही रस्ते वाहतुकीच्या तुलनेत अधिक सुरक्षित, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक मानली जाते. यामुळे इंधनाची बचत, कार्बन उत्सर्जनात घट आणि रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होते. उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची वेळेत आणि सुरक्षित वाहतूक करण्यासाठीही हा पर्याय अधिक प्रभावी ठरत आहे.

व्यवसाय विस्ताराला नवे बळ

भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीतील बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्याच्या धोरणाशी सुसंगत असलेला हा उपक्रम भुसावळ विभागासाठी नवीन व्यावसायिक संधी निर्माण करणारा ठरणार आहे. ग्राहक-केंद्रित सेवा, आधुनिक पायाभूत सुविधा, कार्यक्षम लॉजिस्टिक्स आणि सातत्यपूर्ण व्यवसाय विकासाच्या बळावर मध्य रेल्वे मालवाहतूक क्षेत्रात अधिक मजबूत स्थान निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे या यशस्वी उपक्रमातून स्पष्ट झाले आहे.