जळगाव : उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई आणि पुणे येथून नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दोन सुपरफास्ट विशेष रेल्वेगाड्यांना मंजुरी दिली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)–नागपूर आणि हडपसर–नागपूर या मार्गांवर या विशेष गाड्या धावणार आहेत. या निर्णयामुळे मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेगाड्यांचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
मुंबई–नागपूर दरम्यान अतिरिक्त रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. सणासुदीचा काळ, वाढती प्रवासी संख्या आणि नियमित गाड्यांमधील आरक्षणाची उपलब्धता लक्षात घेता विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याची आवश्यकता व्यक्त केली गेली होती. या मागणीसाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार स्मिता उदय वाघ आणि आमदार चैनसुख संचेती यांनीही पाठपुरावा केला होता. याशिवाय मध्य रेल्वेचे झेडआरयूसीसी सदस्य ॲड. महेंद्रकुमार बुरड आणि पश्चिम रेल्वेचे डीआरयूसीसी सदस्य महेंद्र कोठारी यांनी मध्य रेल्वेचे पीसीओएम अरविंद माळखेडे आणि सीपीटीएम डॉ. मिलिंद हिरवे यांची भेट घेऊन अतिरिक्त विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती. या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने दोन विशेष सुपरफास्ट गाड्यांची घोषणा केली आहे.
एलटीटी–नागपूर विशेष सुपरफास्ट
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि नागपूर दरम्यान धावणाऱ्या पहिल्या विशेष गाडीचे क्रमांक ०१०८९ आणि ०१०९० असे आहेत. या गाडीच्या दोन्ही दिशांनी प्रत्येकी चार फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०१०८९ ही दर गुरुवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी ती नागपूरला पोहचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०९० ही दर शुक्रवारी आणि सोमवारी नागपूर येथून दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी ती लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल. या विशेष गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. एलटीटी–नागपूर सेवा ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान, तर नागपूर–एलटीटी सेवा ६ ते १६ नोव्हेंबरदरम्यान चालविण्यात येणार आहे. दोन्ही दिशांनी प्रत्येकी चार फेऱ्या नियोजित आहेत.
हडपसर–नागपूर साप्ताहिक विशेष
पुणे आणि विदर्भातील प्रवाशांसाठी हडपसर–नागपूर दरम्यान दुसरी विशेष सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू करण्यात येणार आहे. या गाडीचे क्रमांक ०१४४३ आणि ०१४४४ असे आहेत. ही साप्ताहिक सेवा असून दोन्ही दिशांनी प्रत्येकी दोन फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०१४४३ दर शनिवारी हडपसर येथून सायंकाळी ४ वाजून ५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४४४ दर रविवारी नागपूर येथून सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी हडपसर येथे पोहोचेल. या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. हडपसर–नागपूर विशेष गाडी ७ आणि १४ नोव्हेंबर रोजी धावणार आहे. तर नागपूर–हडपसर परतीच्या गाड्या ८ आणि १५ नोव्हेंबर रोजी धावतील. या गाडीच्या दोन्ही दिशांनी प्रत्येकी दोन फेऱ्या होणार आहेत.
कायमस्वरूपी रेल्वेसेवेची अपेक्षा
या विशेष गाड्यांच्या घोषणेमुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळणार असला, तरी मुंबई–नागपूर आणि पुणे–नागपूर मार्गावर कायमस्वरूपी अतिरिक्त रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी कायम आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता नियमित गाड्यांच्या फेऱ्या वाढविणे, डब्यांची संख्या वाढविणे आणि विशेष गाड्यांचे कालावधीनुसार संचालन सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः जळगाव, भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांसाठी या अतिरिक्त सेवांचा उपयोग होणार आहे. आता या विशेष गाड्यांच्या आरक्षणाला आणि प्रवाशांच्या प्रतिसादाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
