जळगाव : मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत जबलपूर–कोयंबतूर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीचे नियमित मेल/एक्सप्रेस सेवेत रूपांतर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांना जोडणाऱ्या या रेल्वे सेवेचा लाभ प्रवाशांना नियमितपणे घेता येणार आहे. विशेष म्हणजे ही गाडी भुसावळ स्थानकावर थांबणार असल्याने खानदेशातील प्रवाशांसाठी या निर्णयामुळे मोठी सोय होणार आहे.

नवीन क्रमांकासह नियमित सेवा

सध्या गाडी क्रमांक ०२१९८/०२१९७ जबलपूर–कोयंबतूर विशेष गाडी म्हणून धावत आहे. आता या गाडीचे नियमित सेवेत रूपांतर करून तिला नवीन क्रमांक देण्यात आले आहेत. गाडी क्रमांक २०१६० जबलपूर–कोयंबतूर साप्ताहिक एक्सप्रेस २३ ऑक्टोबरपासून दर शुक्रवारी जबलपूर येथून सुटणार आहे. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक २०१५९ कोयंबतूर–जबलपूर साप्ताहिक एक्सप्रेस २६ ऑक्टोबर २०२६ पासून दर सोमवारी कोयंबतूर येथून रवाना होईल. जबलपूर–कोयंबतूर गाडी क्रमांक २०१६० दर शुक्रवारी रात्री ११.५० वाजता जबलपूर येथून सुटेल. ही गाडी रविवारी दुपारी २.३० वाजता कोयंबतूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक २०१५९ दर सोमवारी सायंकाळी ५.०५ वाजता कोयंबतूर येथून सुटून बुधवारी सकाळी ८.४५ वाजता जबलपूर येथे पोहोचणार आहे.

भुसावळसह महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे

या गाडीला जबलपूरपासून कोयंबतूरपर्यंत अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. नरसिंहपूर, गाडरवारा, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा आणि भुसावळनंतर गाडी नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम आणि मडगाव येथे थांबणार आहे. त्यानंतर कारवार, कुमटा, मूकाम्बिका रोड बिंदूर, कुंदापूर, उडुपी, मुलकी, मंगळुरू, कासारगोड, कन्नूर, वडकारा, कोझिकोड मेन, तिरूर, शोरनूर जंक्शन आणि पलक्कड़ या स्थानकांवरही गाडीला थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम आणि दक्षिण भारतातील विविध शहरांना जोडणाऱ्या या सेवेचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

डब्यांची अशी रचना; प्रवाशांना फायदा

गाडीच्या संरचनेत वातानुकूलित तसेच शयनयान आणि सामान्य श्रेणीच्या डब्यांचा समावेश आहे. गाडीमध्ये ०१ वातानुकूलित प्रथम श्रेणी, ०२ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ०६ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ०९ शयनयान श्रेणी आणि ०४ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. याशिवाय ०२ सामान व गार्ड ब्रेक व्हॅन असतील. विशेष गाडीचे नियमित सेवेत रूपांतर झाल्यामुळे प्रवाशांना या मार्गावर अधिक नियोजित आणि नियमित रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः भुसावळ येथे थांबा असल्याने जळगाव जिल्ह्यासह खानदेशातील प्रवाशांना दक्षिण भारताकडे जाण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. कोयंबतूर, मंगळुरू, उडुपी, गोवा, रत्नागिरी आणि मुंबईमार्गे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठीही या गाडीचा उपयोग होणार आहे.

प्रवाशांनी नवीन गाडी क्रमांक आणि सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे. आरक्षित तिकिटांसाठी प्रवासी आयआरसीटीसीच्या माध्यमातून ऑनलाइन बुकिंग करू शकतात. अनारक्षित तिकिटांसाठी रेलवन ॲपचा वापर करता येणार आहे. गाडीच्या थांब्यांची सविस्तर माहिती, आगमन-विसर्जनाच्या वेळा आणि अन्य अद्ययावत माहितीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळाचा किंवा एनटीईएस ॲपचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.