जळगाव : कसारा–मनमाड दरम्यान तिसरा, चौथा रेल्वे मार्ग उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेली मान्यता उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या मार्गासाठी सुमारे १०,१५४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, तो पूर्ण झाल्यानंतर भुसावळ–मुंबई दरम्यान सध्या धावणाऱ्या गाड्यांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. नवीन गाड्यांचा मार्गही मोकळा होणार आहे.

कसारा घाट हा मध्य रेल्वेच्या दृष्टीने सर्वाधिक आव्हानात्मक विभाग मानला जातो. कसारा–इगतपुरी दरम्यान तीव्र चढाव असल्यामुळे सध्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना अतिरिक्त इंजिन जोडावे लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करुन ठेवावी लागते. कसारा–मनमाड दरम्यान तिसरा आणि चौथा मार्ग तयार झाल्यानंतर रेल्वे गाड्यांचे संचालन अधिक सुटसुटीत होईल. विविध प्रकारच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गवाटप करता येईल. परिणामी, भुसावळ–मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाड्यांना कसारा घाट विभागात थांबे किंवा विलंब कमी प्रमाणात सहन करावे लागतील. भुसावळ हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे. दिल्ली, कोलकाता, प्रयागराज, वाराणसी, पटना, गोरखपूर, लखनौ, नागपूर आदी दिशांनी येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांसाठी भुसावळ महत्त्वाचा टप्पा आहे. या सर्व गाड्या मुंबईकडे जाताना कसारा–मनमाड अवघड मार्गावरूनच धावतात.

नवीन रेल्वे गाड्यांचा मार्ग मोकळा

सध्या भुसावळ ते मुंबई दरम्यानच्या अंतरात दोन मुख्य मार्गांवरच प्रवासी आणि मालगाड्यांचा प्रचंड ताण आहे. सिग्नल प्रतीक्षा, ओव्हरटेक, क्रॉसिंग आणि घाटातील गती मर्यादा यामुळे बऱ्याच गाड्या उशिरा पोहोचतात. मनमाड आणि कसारा दरम्यान नवीन तिसरा आणि चौथा मार्ग उपलब्ध झाल्यावर प्रवासी व माल वाहतूक गाड्या वेगवेगळ्या मार्गांवर वळवता येतील. वाहतुकीचा ताण हाताळणे सोपे जाईल. याचा थेट लाभ भुसावळ–मुंबई मार्गावरील सर्व एक्स्प्रेस, सुपरफास्ट आणि मेमू गाड्यांना होणार आहे. मुंबई हे राज्यासह देशाचे आर्थिक केंद्र असल्यामुळे उत्तर आणि पूर्व भारतातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी मुंबईकडे ये-जा करतात. मात्र, सध्या मार्गक्षमता मर्यादित असल्याने नवीन गाड्या सुरू करणे किंवा विद्यमान गाड्यांच्या फेऱ्या वाढविणे कठीण ठरत आहे. कसारा आणि मनमाड दरम्यान तिसरा-चौथा मार्ग तयार झाल्यानंतर भुसावळ–मुंबई दरम्यान नवीन मेमू तसेच एक्सप्रेस गाड्या सुरू करता येतील. सणासुदीच्या काळात विशेष गाड्या सहज चालवता येतील. गर्दीच्या हंगामात अतिरिक्त डबे किंवा फेऱ्या वाढविणे शक्य होईल. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

जलद माल वाहतुकीचा उद्योगांना फायदा

जळगाव जिल्हा हा केळी, कापूस आणि इतर शेतीमालाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागातून औद्योगिक मालाची वाहतूकही मोठ्या प्रमाणात मुंबई बंदराकडे होते. अतिरिक्त मार्गामुळे मालगाड्यांना स्वतंत्र आणि अधिक सुलभ मार्ग उपलब्ध होईल. फळे, भाजीपाला व इतर शेतीमाल जलदगतीने मुंबई बाजारपेठेत पोहोचू शकेल. औद्योगिक उत्पादनाची वाहतूक वेळेत होईल. निर्यात प्रक्रियेला गती मिळेल. जळगाव ते मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता चौथ्या मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. कसारा–मनमाड तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग पूर्णत्वास आल्यावर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकणार आहे.