जळगाव : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वे जाळे विस्तारित आणि गतीमान करण्याकरता केंद्रीय अर्थसंकल्पात सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली आहे. ज्यामध्ये मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद या दोन कॉरिडॉरचा सुद्धा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागासाठीही काही महत्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात अपेक्षित होत्या. त्याची किती पूर्तता झाली, त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
भुसावळ विभाग केवळ एक प्रशासकीय विभाग नसून, तो संपूर्ण मध्य रेल्वे व्यवस्थेचा कणा मानला जातो. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर-दक्षिण भारतातील अनेक महत्त्वाचे औद्योगिक पट्टे, संरक्षण आस्थापना, ऊर्जा प्रकल्प तसेच व्यापारी केंद्रे रेल्वे मार्गाने जोडण्याचे कार्य हा विभाग करतो. या विभागाचा भौगोलिक विस्तार महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांपासून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर आणि खंडवा जिल्ह्यांपर्यंत आहे. दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक आणि मोठ्या प्रमाणावर मालगाड्यांचे संचालन करून हा विभाग देशाच्या आर्थिक घडीला चालना देतो. पूर्व-पश्चिम रेल्वे वाहतुकीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणूनही भुसावळ विभागाची विशेष ओळख आहे.
मुंबईकडून येणाऱ्या मार्गावर इगतपुरी हे प्रमुख प्रवेशद्वार असून, पुढे हा मार्ग खंडवा आणि बडनेरापर्यंत पसरलेला आहे. सुमारे ७४२ किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या रेल्वे मार्गांचे संचालन, देखभाल व सुरक्षित व्यवस्थापनाची जबाबदारी भुसावळ विभाग यशस्वीपणे पार पाडत असून, भारतीय रेल्वेच्या कार्यक्षमतेत त्याचा मोलाचा वाटा आहे. अशा या विभागात गेल्या काही वर्षांपासून अमृत भारत योजनेअंतर्गत विविध स्थानकांच्या विकासाला चालना देण्यात आली आहे. त्या-त्या ठिकाणी आणखी पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी केंद्राच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात, त्याची स्पष्टता अर्थसंकल्पानंतर प्रसिद्ध होणाऱ्या रेल्वेच्या पिंक बुकमधून होऊ शकणार आहे.
पिंक बुककडे आता सर्वांचे लक्ष
भुसावळ येथून मुंबई तसेच पुण्यासाठी दोन स्वतंत्र रेल्वेगाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयाकडून यापूर्वीच मुंबई मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळून दोन्ही गाड्यांची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात होण्याची अपेक्षा होती.
उपलब्ध माहितीनुसार, भुसावळ–मुंबई स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याबाबतचा प्राथमिक प्रस्ताव एप्रिल २०२४ मध्ये डीआरएम कार्यालयाने सादर केला होता. त्यानंतर अल्पावधीतच परिचालन विभागाने आवश्यक तांत्रिक अहवाल तयार करून पाठवला. त्याच धर्तीवर भुसावळ–पुणे स्वतंत्र रेल्वे सुरू करण्यासंदर्भातील प्रस्तावही एप्रिल २०२४ मध्ये सादर करण्यात आला असून, त्यावरही परिचालन विभागाचा तांत्रिक अहवाल तयार करून पाठवला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर प्रसिद्ध होणाऱ्या पिंक बुकमधून दोन्ही रेल्वे गाड्यांना ग्रीन सिग्नल मिळाला किंवा नाही, ते स्पष्ट होणार आहे.

