जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव शहरात व्यापारी, प्रवासी संघटना आणि विविध सामाजिक-राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पंकज सिंग यांना रेल्वे सुविधांबाबत निवेदन देण्यात आले. विशेषतः धरणगावला मालधक्का सुरू करण्याची मागणी सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
धरणगावसह परिसरातून दरवर्षी मका, गहू, ज्वारी यांसारख्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. आणि सुमारे १० ते १५ लाख क्विंटल माल इतर राज्यांकडे पाठवला जातो. मात्र, धरणगाव येथे मालधक्का नसल्यामुळे हा माल इतर स्थानकांच्या माध्यमातून पाठवावा लागतो. त्यामुळे वेळ, खर्च व श्रम वाढतात.
जर धरणगाव येथे मालधक्का सुरू झाला तर शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, व्यापाराला गती येईल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही वाढतील, असे मत श्रीजी जिनिंगचे संचालक नयन गुजराथी यांनी व्यक्त केले. या मागणीवर प्रतिक्रिया देताना विभागीय व्यवस्थापक सिंग यांनी सकारात्मकता दर्शवली.
त्यांनी या विषयावर गांभीर्याने विचार करून लवकरच धरणगाव, पारोळा, एरंडोल व चोपडा येथील व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करून सखोल चर्चा करण्याचे आश्वासन दिले. रेल्वे प्रशासन स्थानिक गरजा लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्यास प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भुसावळ–नंदुरबार एक्स्प्रेसचा विस्तार करा
दरम्यान, भुसावल–दादर आणि काकीनाडा–हिसार, या एक्स्प्रेस गाड्यांना कायमस्वरूपी मान्यता दिल्याबद्दल उपस्थितांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य प्रतिक जैन यांनीही याबद्दल समाधान व्यक्त करत रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी विविध प्रवासी संघटना, राजकीय पदाधिकारी तसेच प्रवासी सल्लागार समितीच्या सदस्यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. उधना–पुणे नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे करण्यात आली. तसेच सुरत–भुसावळ पॅसेंजर गाडी पूर्वीच्या वेळापत्रकानुसार चालवावी, ताप्ती गंगा व बरौनी एक्सप्रेसला धरणगाव येथे थांबा द्यावा, सुरत–अमरावती एक्स्प्रेस आठवड्याचे सातही दिवस चालवावी, प्रेरणा एक्स्प्रेसला अमळनेर येथे थांबा द्यावा, भुसावळ–नंदुरबार एक्स्प्रेस सुरतपर्यंत वाढवावी, अशा विविध मागण्यांचा त्यात समावेश होता.
हॉलिडे धरणगाव, अमळनेरला थांबवा
याशिवाय हॉलिडे एक्सप्रेस आणि चेन्नई–भगत की कोठी एक्स्प्रेस गाड्यांना धरणगाव आणि अमळनेर येथे थांबा देण्याची मागणीही करण्यात आली. धरणगावसरह अमळनेर स्टेशनवर सुरू असलेल्या अमृत भारत स्थानक पुनर्विकास योजनेची कामे जलद गतीने पूर्ण करावीत, तसेच भोणे स्थानकावर मेमू गाड्यांना थांबा मिळावा, अशीही मागणी करण्यात आली.
सदर सर्व मागण्यांवर रेल्वे प्रशासनाकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याची माहिती देण्यात आली. काही मागण्यांवर सकारात्मक विचार सुरू असल्याचे संकेत देण्यात आले, तर काही बाबींवर अधिक अभ्यास व नियोजन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. एकूणच, या बैठकीमुळे धरणगाव परिसरातील रेल्वे सुविधा सुधारण्यासाठी पुढाकार घेतला जात असल्याची भावना व्यापारी व प्रवासी वर्गामध्ये निर्माण झाली असून आगामी काळात ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
