जळगाव : आषाढी एकादशीच्या वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भुसावळ–पंढरपूर या मार्गांवर विशेष रेल्वे धावणार असून, अनारक्षित विशेष रेल्वेच्या चार फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या विशेष गाडीतील सर्व जनरल तिकिटांची संपूर्ण खरेदी केली असून, त्यामुळे वारकऱ्यांना भुसावळ ते पंढरपूर हा प्रवास पूर्णपणे मोफत करता येणार आहे.

मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक ०११५९ ही विशेष रेल्वे २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळ स्थानकावरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०११६० ही विशेष रेल्वे २५ आणि २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळ येथे दाखल होईल. या विशेष रेल्वेला दोन्ही बाजूने जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे खानदेश, उत्तर महाराष्ट्र तसेच मार्गावरील विविध भागांतील वारकऱ्यांना या सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे. रेल्वेत १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश करण्यात आला असून, मोठ्या संख्येने वारकऱ्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाची असल्याने सर्वसामान्य भाविकांना सहजपणे या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

जळगाव, बुलढाण्यातील वारकऱ्यांना लाभ

भुसावळ–पंढरपूर विशेष रेल्वे सुरू करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. वारकऱ्यांची वाढती संख्या आणि आषाढी वारीचे महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या मागणीला तत्काळ मंजुरी दिली. विशेष रेल्वेची घोषणा झाल्यानंतर रक्षा खडसे यांनी पुढाकार घेत या गाडीतील सर्व जनरल तिकिटांची खरेदी केली. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या कोणत्याही वारकऱ्याला प्रवासभाडे भरावे लागणार नाही. रक्षा खडसे यांचा हा उपक्रम नवीन नसून गेल्या अनेक वर्षांपासून त्या सातत्याने वारकऱ्यांच्या सेवेसाठी अशीच मदत करत आहेत. जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील हजारो वारकरी दरवर्षी या विशेष रेल्वेद्वारे पंढरपूरच्या वारीसाठी रवाना होतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर आर्थिक भार पडू नये आणि त्यांना सुरक्षित, सुलभ व सन्मानपूर्वक प्रवास करता यावा, या उद्देशाने त्या दरवर्षी विशेष रेल्वेतील सर्वसाधारण तिकिटांची खरेदी करतात.

दरवर्षीची पंरपरा यंदाही कायम

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यंदाही दरवर्षीची परंपरा कायम ठेवत त्यांनी वारकऱ्यांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक मानली जाते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकऱ्यांची ही मोठी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यात भुसावळ–पंढरपूर विशेष रेल्वेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, मोफत प्रवासाच्या सुविधेमुळे हजारो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुरक्षित, आरामदायी आणि विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने यंदाची आषाढी वारी अधिक आनंददायी आणि सुलभ होणार असल्याची भावना वारकरी बांधवांकडून व्यक्त होत आहे.