जळगाव : जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी लाच प्रकरणी सातत्याने जाळ्यात अडकत आहेत. त्यात भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकाची शुक्रवारी भर पडली. संबंधितावर खासगी इसमासह त्याच्याच पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, दोन्ही संशयित फरार घोषित करण्यात आले आहेत.
राजू सांगळे (नेमणूक बाजारपेठ पोलीस ठाणे, भुसावळ) आणि सलीम हकीम कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, बोदवड, जि. जळगाव), अशी ३० हजार रुपये लाच मागून तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्याची तयार दर्शविणाऱ्या संशयितांची नावे आहेत. दोघांविरुद् बाजारपेठ पोलीस ठाण्यात जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या तक्रारीवरुन भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार आणि त्याचा मित्र यांची २८ मार्च रोजी एका व्यक्तीसोबत भुसावळ शहरातील खडका चौफुलीवर उधार दिलेले पैसे मागत असताना किरकोळ हाणामारी झाली होती. त्यावरुन तक्रारदार आणि त्याच्या मित्राविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात समोरच्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्यात अटक न करण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराच्या पत्नीकडे पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे आणि खासगी इसम सलीम कुरेशी यांनी मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता खासगी इसम कुरेशी याने उपनिरीक्षक सांगळे यांच्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने उपनिरीक्षक सांगळे यांची भेट घेतली. त्यांनी अटक न करता केवळ चॅप्टर केस करुन सोडून देण्याच्या मोबदल्यात २० रुपयांची लाच स्वीकारण्यात संमती दर्शवली. प्रत्यक्ष, लाच स्वीकारली नसली तरी दोघांनी लाच मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, निरीक्षक स्मिता नवघरे, हेमंत नागरे, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील तसेच अमोल पाटील, भूषण पाटील आदींनी यशस्वी केली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात प्रशासनाला बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र, लाच मागितल्याप्रकरणी भुसावळमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या प्रयत्नांनी कुठेतरी गालबोट लागले आहे. नागरिकांनीही सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. कायद्याचे रक्षकच लाच प्रकरणी जाळ्यात अडकत असतील तर सामान्यांनी दाद मागावी तरी कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
