जळगाव : भुसावळ येथील नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी त्यांच्या विरोधात खोटे व बनावट कागदपत्रे सादर करून जात पडताळणीत अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी विरोधात केला आहे. त्या संदर्भात पोलीस अधीक्षकांकडे त्यांनी लेखी तक्रारही केली आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्री सावकारे यांची पत्नी रजनी सावकारे यांनीही त्यांची बाजू पत्रकारांसमोर मांडली असून, ज्यामुळे भुसावळचे राजकीय वातावरण आणखी जास्त तापण्याची चिन्हे आहेत.

नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात वैधतेचा प्रश्न सध्या जळगाव येथील जात पडताळणी समितीसमोर सुनावणीसाठी प्रलंबित आहे. तत्पूर्वीच या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, नगराध्यक्ष निवडणुकीत त्यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांनी त्यांच्या जात दाव्याला आव्हान देण्यासाठी काही कागदपत्रे सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, नगराध्यक्षा भंगाळे यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सावकारे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी संगनमताने उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील फत्तेपूर बजेरिया येथे जाऊन काही कागदपत्रे मिळवली. त्यानंतर ही कागदपत्रे जळगाव येथील जात पडताळणी समितीकडे पुराव्याच्या स्वरूपात सादर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जात पडताळणी समितीच्या दक्षता पथकाने संबंधित कागदपत्रांची तपासणी करून अहवाल सादर केला असला, तरी त्या अहवालातील नोंदींवरही भंगाळे यांनी आक्षेप घेतला आहे. अहवालात नमूद करण्यात आलेली शेती व मालमत्ता ही त्यांची स्वतःची किंवा त्यांच्या नातेवाईकांची नसून ती इतर व्यक्तींच्या मालकीची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता या सर्व घडामोडींवर अंतिम निर्णय जात पडताळणी समितीच्या सुनावणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे केवळ त्यांच्या जात पडताळणी प्रक्रियेवर परिणाम होत नाही, तर संबंधित निष्पाप नागरिकांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचेही नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. या संपूर्ण प्रकरणात रजनी सावकारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

काय म्हणाल्या रजनी सावकारे?

पुराव्यादाखल सादर करण्यात आलेली कागदपत्रे खरी की खोटी, याचा अंतिम निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा केवळ जात पडताळणी समितीकडेच आहे.

यासंदर्भात समिती ही स्वतंत्र आणि कायदेशीर अधिकार असलेली यंत्रणा असून, ती सर्व पुरावे तसेच कागदपत्रे आणि संबंधित बाबींची सखोल तपासणी करूनच निष्कर्षापर्यंत पोहोचते. या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप होऊ नये. समितीला तिचे काम स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपणे करू द्यावे. या प्रक्रियेत मी किंवा नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करण्याचा संबंध येत नाही. माझ्याही जात प्रमाणपत्रावर नगराध्यक्षांनी जात पडताळणी समितीकडे हरकत घेतली होती. म्हणून काही मी त्यांची कुठे तक्रार केली नाही.