जळगाव : विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारीची जोरदार तयारी करून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि विचारांवर विश्वास व्यक्त करत चौधरी यांनी माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्यासह पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
अनिल चौधरी हे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू आहेत. यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी जळगावमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची भूमिका घेत त्यांनी जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपंचायती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. यापूर्वी २०१० मध्येही त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना चौधरी यांना माघार घेण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी चौधरी यांच्याशी अनेकदा संवाद साधल्याचेही बोलले जात होते. मात्र, चौधरी यांनी अखेरच्या कोणत्याही उमेदवाराला थेट पाठिंबा न देता निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होण्याचा निर्णय जाहीर केला.
यावेळी चौधरी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्याकडून आपल्याला संदेश प्राप्त झाल्याचा दावा केला होता. त्याचवेळी आगामी काळात आपण शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार, त्यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करून काही महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. चौधरी यांच्या पक्षप्रवेशामुळे भुसावळच्या स्थानिक राजकारणात त्यांच्या समर्थकांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणे, आगामी निवडणुका आणि विविध राजकीय गटांतील संभाव्य आघाड्या या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रवेशाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा मतदारसंघ असलेल्या भुसावळमध्ये यापूर्वीपासूनच विविध राजकीय गटांमध्ये प्रभावासाठी चुरस आहे. मंत्री सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव पत्कराला लागला तेव्हापासून त्यात आणखी भर पडली आहे. अशा परिस्थितीत अनिल चौधरी यांचा शिंदे गटातील प्रवेश कोणत्या राजकीय समीकरणांना बळ देतो आणि त्याचा आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कितपत परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चौधरी यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणातही नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
