जळगाव: भुसावळ–पुणे तसेच भुसावळ–मुंबई या मार्गांवर दोन नवीन गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. भुसावळ जंक्शनवरून दोन्ही मार्गांवर थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यास प्रवाशांची मोठी सोय होणार असून, या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर दोन्ही गाड्या सुरू करण्याबाबत पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
भुसावळ विभागीय कार्यालयांतर्गत रेल्वे सल्लागार समितीची बैठक डीआरएम पुनीत अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विभागात सध्या सुरु असलेल्या विविध ठिकाणच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रवासी सुविधा वाढविण्यासंदर्भात नवीन गाड्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी एडीआरएम सुनीलकुमार सुमन, एस. के. मिना, डीसीएम बी. बी. तपस्वी आदी उपस्थित होते.
या दरम्यान, रेल्वे स्थानकांवर गाड्यांचे फलाट (प्लॅटफॉर्म) अचानक बदलल्यामुळे प्रवाशांना होणारी धावपळ आणि गैरसोय कमी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अग्रवाल यांनी सांगितले. आता कोणत्याही गाडीचा फलाट बदलण्याची वेळ आल्यास त्याची सूचना किमान ३० मिनिटे आधी जाहीर केली जाणार आहे. स्थानकांवर अनेकदा एकाच वेळी अनेक गाड्या येत असल्यामुळे त्यांचे फलाट क्रमांक अचानक बदलले जातात. त्यामुळे प्रवाशांना आपले सामान घेऊन एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी धाव घ्यावी लागते. अनेकदा काही प्रवाशांची गाडीही सुटते. ही समस्या लक्षात घेऊन फलाट बदलाची सूचना किमान अर्धा तास आधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डीआरएम अग्रवाल म्हणाले.
कॉर्ड लाईनवर नवीन फलाट
याशिवाय भुसावळ येथे कॉर्ड लाईनवर नवीन फलाट उभारण्याचा प्रस्तावही रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार असल्याची सल्ल्गार समितीच्या माहिती बैठकीत देण्यात आली. कॉर्ड लाईनवर नवीन फलाट तयार झाल्यास भुसावळ स्थानकावर न येता परस्पर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवासाची सुविधा प्रवाशांना उपलब्ध होईल. बैठकीदरम्यान भुसावळ विभागातील सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावाही घेण्यात आला. विभागीय व्यवस्थापक अग्रवाल यांनी विभागातील विकासकामांची माहिती दिली. तसेच नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर सुरू असलेल्या कामांची माहिती सादर केली.
१० स्थानकांवरील कामे प्रगतीपथावर
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भुसावळ विभागातील पाच स्थानकांवरील कामे पूर्ण झाली असून, १० स्थानकांवरील कामे प्रगतीपथावर आहेत. स्थानकांवर प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा, स्वच्छता, प्रतीक्षागृहे, सुधारित प्रवेश मार्ग आणि माहिती प्रणाली यांचा समावेश या विकासकामांमध्ये करण्यात येत आहे. रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीला विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील काळातही विविध सुधारणा आणि सुविधा वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अजयकुमार यांनी प्रास्ताविक केले.
