जळगाव : रेल्वे प्रवास सुरक्षित आणि वेळेवर व्हावा यासाठी उपलब्ध करून दिलेली अलार्म चेन पुलिंग सुविधा सध्या गैरवापरामुळे चर्चेत आली आहे. केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी असलेली धोक्याची सूचना देणारी साखळीची ही सुविधा किरकोळ कारणांसाठी वापरली जात असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने कारवाईचा बडगा उगारुन संबंधित प्रवाशांना साखळीचा दुरुपयोग न करण्याचा इशारा दिला आहे.
धोक्याची सूचना देणारी साखळी ओढल्यामुळे धावती रेल्वे गाडी तत्काळ थांबवावी लागते. त्यामुळे केवळ त्या गाडीतील प्रवाशांनाच नव्हे, तर मागून येणाऱ्या इतर रेल्वे गाड्यांनाही उशीर होतो. परिणामी, संपूर्ण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक विस्कळीत होते. एका किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी केलेला हा प्रकार शेकडो प्रवाशांसाठी त्रासदायक ठरतो. रेल्वे कायदा कलम १४१ अंतर्गत धोक्याची सूचना देणाऱ्या साखळीचा गैरवापर करणे, हा दंडनीय अपराध आहे. दोषी आढळल्यास संबंधित प्रवाशावर दंडात्मक तसेच अन्य कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. काही प्रकरणांत न्यायालयीन कारवाईचाही सामना करावा लागू शकतो, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
प्रवाशांनी प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या गाडीच्या निर्धारित वेळेआधी स्थानकावर पोहोचावे. तसेच प्रवासादरम्यान मर्यादित सामान सोबत ठेवावे. ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग प्रवासी यांच्यासाठी स्थानक व्यवस्थापक कार्यालयात उपलब्ध असलेल्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या किंवा व्हीलचेअर यांचा वापर करून वेळेत फलाटावर पोहोचता येईल. आणि स्थानकावर थांबलेल्या गाडीत सुरक्षितपणे चढता येईल. यामुळे किरकोळ कारणांसाठी अलार्म चेनचा वापर करण्याची गरज भासणार नाही, असेही रेल्वे प्रशासनाने सूचित केले आहे.
तीन महिन्यात १.५ लाखांचा दंड
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात डिसेंबर २०२५ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अलार्म चेन पुलिंगच्या एकूण ४९५ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यापैकी ४२६ प्रकरणांत संबंधित व्यक्तींना दोषी ठरवण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण १,४३,२०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. विभागाकडून या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, दोषींवर तत्काळ कारवाई केली जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, प्रवासी वेळेत गाडीत चढू न शकल्याने तसेच मोबाईल फोन किंवा इतर वस्तू खाली पडल्याने, चुकून साखळी ओढली जाणे किंवा इतर किरकोळ व अनावश्यक कारणे आपत्कालीन स्वरूपाची नाहीत. अशा प्रकारांना गंभीर गुन्हा मानले जाते. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रवासात धोक्याची सूचना देणारी साखळी ओढताना सावधानी बाळगणे गरजेचे आहे.

