जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी करत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. महसूल वाढीसह प्रवासी सेवांतील सुधारणा, माल वाहतुकीतील वाढ आणि सुरक्षेच्या उपाय योजनांमुळे विभागाने एक नवा मानदंड निर्माण केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत महसूलात ६.६२ टक्क्यांची वाढ नोंदवत १,७३६ कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला आहे.
भुसावळचे विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना सांगितले की, विभागाची ही कामगिरी केवळ आर्थिक वाढ दर्शवत नाही, तर नियोजनबद्ध व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा वापर आणि सेवा गुणवत्तेतील सातत्यपूर्ण सुधारणा यांचा एकत्रित परिणाम आहे. तत्पूर्वी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतिक गोस्वामी यांनी ऑनलाइन संवादातून विभागाच्या कामगिरीचे कौतुक केले. प्रवासी सेवांच्या क्षेत्रातही भुसावळ विभागाने लक्षणीय प्रगती साधली आहे. प्रवासी महसूल ९३८.०९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, तो निर्धारित लक्ष्याच्या तुलनेत १.७८ टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय प्रवासी संख्येतही वाढ होऊन ४६८ लाख प्रवाशांनी रेल्वे सेवांचा वापर केला आहे. स्थानकांवरील स्वच्छता, तिकीट व्यवस्थापनातील सुलभता, डिजिटल सेवा आणि वेळेचे काटेकोर पालन यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सोयीस्कर झाला आहे.
६,६५० टन शेती मालाची वाहतूक
माल वाहतुकीच्या बाबतीत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने कृषी क्षेत्राला मोठा आधार दिला आहे. ‘शेतकरी समृद्धी विशेष रेल’ या उपक्रमाअंतर्गत ५२ फेऱ्यांमधून ६,६५० टन शेती मालाची वाहतूक करण्यात आली. या माध्यमातून रेल्वेला २.४० कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी जलद आणि सुरक्षित बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचेही अग्रवाल यांनी नमूद केले. विभागाने माल वाहतुकीतील वेळ आणि खर्च कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. लॉजिस्टिक्स व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी तांत्रिक सुधारणा आणि समन्वय वाढवण्यात आला आहे.
हरित उपक्रमांवरही भर
सुरक्षेच्या दृष्टीनेही भुसावळ विभागाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. ट्रॅक देखभाल, सिग्नल प्रणालीचे आधुनिकीकरण आणि सतत निरीक्षण, यामुळे अपघातांची संख्या कमी ठेवण्यात यश आले आहे. तसेच, रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. विभागाने हरित उपक्रमांवरही भर दिला असून ऊर्जा बचतीसह सौरऊर्जेचा वापर आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांद्वारे शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारला आहे. स्थानक परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. भविष्यात भुसावळ विभाग आणखी आधुनिकीकरण, प्रवासी सुविधा वाढ आणि माल वाहतूक क्षमता विस्तार, यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत देण्यात आले. एकूणच, भुसावळ विभागाची ही सर्वांगीण प्रगती भारतीय रेल्वेच्या सेवा गुणवत्तेत आणि कार्यक्षमतेत वाढ घडवून आणणारी ठरली आहे.
