जळगाव : रेल्वेची वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यामागे आधुनिक तंत्रज्ञानाइतकेच कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान, अनुभव आणि कर्तव्यनिष्ठा हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. भुसावळ विभागात अलीकडे घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठे अपघात आणि जीवित हानी टळली आहे.

महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांच्या हस्ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित एका कार्यक्रमात मध्य रेल्वेच्या १२ कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सुरक्षा कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. ज्यामध्ये भुसावळ विभागातील तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. पैकी मालवाहू गाडीचे चालक फुलकुमार गौतम हे १९ जानेवारी रोजी गाडी क्रमांक १२४०६ घेऊन नियोजित मार्गावर कर्तव्य बजावत होते. गाडी वेगात असताना किलोमीटर ७७४/११–१९ या ठिकाणी रुळांवर ट्रॅक मेंटेनर काम करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नियमानुसार त्यांनी तत्काळ शिटी देऊन इशारा केला; मात्र, संबंधित कर्मचारी लगेच रुळांवरून दूर गेला नाही. त्यामुळे चालक गौतम यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपत्कालीन ब्रेक वापरला. परिणामी, मालगाडी काही अंतरावर थांबली. आणि मोठा अनर्थ टळला. चालकाच्या निर्णय क्षमतेमुळे ट्रॅक मेंटेनरचे प्राण वाचले.

दुसऱ्या घटनेत नऊ जानेवारी रोजी एमएसएम (कॅरेज अँड वॅगन) राहुल चंदा हे नेहमीप्रमाणे मालगाडीची तपासणी करत असताना, एका डब्याच्या बोगी बोल्स्टरमध्ये तांत्रिक दोष असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा दोष दुर्लक्षित राहिला असता चालत्या गाडीमध्ये मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्वरित संबंधित अधिकारी, कंट्रोल व ऑपरेटिंग विभागाला माहिती दिली. वेळेत उपाययोजना करण्यासाठी गाडी थांबवून दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे संभाव्य जीवितहानी व मालमत्तेचे मोठे नुकसान टळले.

तसेच, गेल्या वर्षी दोन डिसेंबर रोजी जळगाव रेल्वे स्थानकावर कर्तव्य बजावत असताना रेल्वे सुरक्षा बलाचे कॉन्स्टेबल विजय सुरडकर यांना गाडी क्रमांक १२११२ मध्ये चढण्याचा प्रयत्न करत असलेला एक प्रवासी अचानक तोल जाऊन पडताना दिसला. सुरडकर यांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ धाव घेऊन त्या प्रवाशाला पकडले. त्यामुळे तो प्रवासी गाडी आणि फलाट्याच्या मधील धोकादायक जागेत पडण्यापासून वाचला. सुरडकर यांच्या त्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाला गंभीर दुखापत होण्यापासून वाचवता आले. स्थानकावरील अनुचित घटना टळली. प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अशा सजग आणि कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या अशा कार्यामुळे रेल्वे प्रशासनाची विश्वासार्हता अधिक बळकट होत असल्याचे महाव्यवस्थापकांनी सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी नमूद केले.