जळगाव : भुसावळ रेल्वे स्थानकावरील एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने फलाटावर अनावधानाने पडलेले वडे आणि पाव उचलून पुन्हा प्रवाशांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदरचा किळसवाणा प्रकार एका प्रवाशाने चित्रीत केल्यानंतर उजेडात आल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित विक्रेत्यावर कठोर कारवाई करत संबंधित स्टॉल तात्पुरता बंद केला आहे. तसेच विक्रेत्याला कारणे दाखवा नोटीस बजावून रेल्वे सुरक्षा बलाकडून ताब्यातही घेण्यात आले आहे.

भुसावळ रेल्वे स्थानकावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे ही रेल्वे प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी मानली जाते. मात्र, एका विक्रेत्याने फलाटावर पडलेले वडे पुन्हा विक्रीसाठी वापरल्याचा प्रकार उघडकीस आल्याने प्रवाशांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही चित्रफितींची तपासणी केली. त्यामध्ये संबंधित विक्रेता पडलेले वडे उचलताना दिसून आल्याने त्याची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा बलाकडे (आरपीएफ) सोपविण्यात आले. सध्या या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू असून, चौकशी अहवालाच्या आधारे रेल्वेच्या नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित स्टॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय संबंधित परवानाधारकाला करार समाप्त करण्याच्या प्रस्तावासह कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या घटनेबाबत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मध्य रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

स्थानक परिसरात कार्यरत सर्व अधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वच्छता, गुणवत्ता आणि परवान्याच्या अटींचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

रेल्वेचे प्रवाशांना हे आवाहन

रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता यावर नियमित देखरेख ठेवली जात असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता किंवा अनधिकृत विक्रेत्यांबाबत काही तक्रार असल्यास प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १३९ वर किंवा संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडे त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्रीच्या प्रक्रियेवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित झाली असून, प्रवाशांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भविष्यातही अशा प्रकारांवर शून्य सहनशीलतेचे धोरण कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.