जळगाव : राज्यात नवीन २० जिल्ह्यांसह ८१ तालुके तसेच तहसील कार्यालयांचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित असताना, वरणगाव तालुका आणि भुसावळ जिल्हा निर्मितीचा प्रश्न आता जनआंदोलनाचे स्वरूप धारण करताना दिसत आहे. यासाठी वरणगावात लोक संघर्ष चळवळ समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ तसेच विविध भागांत राबविण्यात आलेल्या या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत स्वतंत्र तालुका आणि जिल्हा निर्मितीच्या मागणीला समर्थन दर्शविले.
मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नागरिकांची प्रशासकीय कामे सुलभ करण्यासाठी २० ते २२ नवीन जिल्ह्यांची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. यात प्रामुख्याने जळगाव, पुणे, अहिल्यानगर, यवतमाळ, बीड, नांदेड, नाशिक आदी मोठ्या जिल्ह्यांच्या विभाजनाचा समावेश आहे. १५ तालुक्यांचा विस्तार असलेल्या जळगाव जिल्ह्यातूनही भुसावळ स्वतंत्र जिल्हा करण्याच्या हालचाली काही वर्षांपासून सुरु आहेत. तथापि, नवीन जिल्ह्यांची निर्मिती ही २०२१ च्या जनगणनेची आकडेवारी आणि भौगोलिक सीमांकन पूर्ण झाल्यानंतरच केली जाणार असल्याचे महसूल विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर, भुसावळ जिल्हा आणि वरणगाव तालुका निर्मितीसाठी राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानात कामगार, शेतकरी, व्यापारी, युवक, महिला तसेच विविध सामाजिक क्षेत्रांतील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने वरणगाव तालुका आणि भुसावळ जिल्हा निर्मितीची मागणी रास्त असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. नागरिकांचा दैनंदिन शासकीय कामांसाठी वेळ आणि आर्थिक खर्च वाढतो. त्यामुळे स्वतंत्र तालुका आणि जिल्हा निर्माण झाल्यास परिसराच्या विकासाला गती मिळेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
अभियानादरम्यान अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत या लढ्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली. आगामी काळात गावागावांत जनजागृती मोहीम राबवून अधिकाधिक लोकांना या आंदोलनाशी जोडले जाईल, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. परिसरातील विविध सामाजिक, व्यापारी संघटना तसेच युवकांनीही या मागणीला पाठिंबा देत शासनाकडे सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बोलताना वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की, वरणगाव तालुका आणि भुसावळ जिल्हा निर्मिती ही जनतेची दीर्घकालीन आणि न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. आता नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. वरणगाव तालुका आणि भुसावळ जिल्हा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आणखी व्यापक जनआंदोलन
भुसावळ जिल्हा आणि वरणगाव तालुका निर्मितीच्या स्वाक्षरी अभियानात नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह उपनगराध्यक्षा अरुणा इंगळे, नगरसेवक मिलिंद मेढे, विरोधी पक्षनेते नाना चौधरी, नगरसेवक आशापक शहा, इरफान सैय्यद, इरफान खाटीक, सभापती श्रद्धा गायकवाड, नगरसेविका वंदना पाटील, मिलिंद भैसे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. अभियानादरम्यान परिसरात उत्साहपूर्ण वातावरण पाहण्यास मिळाले. नागरिकांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात या मागणीसाठी आणखी व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
