scorecardresearch

भूषण लोंढेला पकडण्यात आठ महिन्यांनंतर यश

आठ महिन्यांपासून फरार असलेल्या या संशयितांना पुण्याच्या मॉडर्न कॉलनीतील इमारतीत पकडण्यात आले

भूषण लोंढेला पकडण्यात आठ महिन्यांनंतर यश
प्रतिनिधिक छायाचित्र

संशयितांना तीन दिवस पोलीस कोठडी
दुहेरी हत्येच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन घेत लग्नाच्या बोहल्यावर चढून अंतर्धान पावलेला पी. एल. ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढेसह तीन जणांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अखेर एकदाचे यश आले. पुणे शहरातील व्यायामशाळेत उपस्थिती लावत पोलिसांनी संबंधितांची माहिती प्राप्त केली. आठ महिन्यांपासून फरार असलेल्या या संशयितांना पुण्याच्या मॉडर्न कॉलनीतील इमारतीत पकडण्यात आले. या वेळी पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या भूषणचा पाठलाग करताना एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. ग्रामीण पोलिसांनी नगरसेवक पुत्राला जेरबंद केले असले तरी शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करणारे नाशिक शहर पोलीस या टोळीवर काय कारवाई करतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे. या टोळीच्या सदस्यांवर खून, खंडणी, हाणामारी, दमदाटी असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच राजाश्रय लाभलेल्या पी. एल. ग्रुपची सातपूर परिसरात दहशत आहे. उपरोक्त प्रकरणातील अन्य संशयितांची न्यायालयाच्या आवारात सरबराई करणारे नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी आक्षेप घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती. त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर लोंढेला अटक झाल्याचा ताजा इतिहास आहे.
शहरात गुन्हेगारी फोफावण्यात राजकीय पदाधिकाऱ्यांचा हातभार असल्याचे वारंवार अधोरेखित झाले आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांविरोधात कारवाई आरंभली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण शिवारातील दरीत जानेवारीच्या प्रारंभी अर्जुन ऊर्फ वाटय़ा महेश आव्हाड आणि निखील विलास गवळे यांचे मृतदेह आढळून आले होते. या प्रकरणी नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ३१ डिसेंबरच्या रात्री पार्टीमध्ये झालेल्या वादातून पी. एल. ग्रुपच्या कार्यालयात ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी सनी ऊर्फ ललित अशोक विठ्ठलकर, निखील मधुकर निकुंभ, प्रिन्स चित्रसेन सिंग, वतन शिवाजी पवार, किशोर सुखदेव गायकवाड या पाच संशयितांना यापूर्वीच अटक झाली आहे. या गुन्ह्याची योजना आखणारे पी. एल. ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे तसेच संदीप गांगुर्डे हे गुन्हा घडल्यापासून फरार झाले होते. या गुन्ह्यात लग्नासाठी भूषणने उच्च न्यायालयाकडून तीन दिवसांचा तात्पुरता जामीन मिळवला. लग्न करून तो पुन्हा फरार झाला. दरम्यानच्या काळात न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनही नामंजूर केला.
आठ महिन्यांपासून फरार असलेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी संबंधितांची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. या वेळी संशयित पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील इमारतीत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. संशयित व्यायामासाठी परिसरातील जीममध्ये जात असल्याचे समजल्यावर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन दिवस व्यायामशाळेत व्यायाम करून संशयितांच्या हालचालींची माहिती मिळविली. त्यानंतर भूषण प्रकाश लोंढे (२७), संदीप रमेश गांगुर्डे (२५) आणि त्यांच्यासमवेत असणारा आकाश दीपक मोहिते (२५) यांना पकडण्यात आले. पोलीस आल्याची चाहूल लागताच भूषणने घराच्या मागील दरवाजातून बाहेर पडत संरक्षक भिंतीवरून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.
यावेळी पुणे पोलीस दलातील हवालदार जखमी झाला. भूषण लोंढे व संदीप गांगुर्डेने गुन्ह्याची योजना तयार करून तो घडवून आणल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच त्यांच्यासोबत जेरबंद झालेला आकाश हा गुन्हा घडल्यापासून त्यांच्यासोबत आश्रयाला असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रदीर्घ काळानंतर जेरबंद झालेल्या पी. एल. ग्रुपवर शहर पोलीस आता काय कारवाई करणार, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आहे. दरम्यान, या संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

भूषण लोंढेची चलाखी
फरार झालेला भूषण लोंढे व संदीप गांगुर्डे यांनी पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून केलेली चलाखीही पुढे आली आहे. राजस्थानमधील कोटा येथे आयटी महाविद्यालयाच्या वसतीगृहात तपासणी होत नसल्याने त्यांनी काही काळ त्या ठिकाणी आश्रय घेतला होता. बलसाड (गुजरात) येथील आश्रमशाळा तसेच कोल्हापूर येथे तालमीत सरावाचे निमित्त करून संशयितांनी लॉजमध्ये वास्तव्य केले. त्यानंतर हे संशयित पुण्यात पोहोचले. फेसबुकवरील मित्राच्या खोलीत नोकरी शोधण्याचे निमित्त करून ते वास्तव्य करत होते.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-08-2016 at 02:22 IST

संबंधित बातम्या