सध्या शालेय परीक्षांचे वारे वाहत असून बच्चे कंपनीला उन्हाळी सुटीचे वेध लागले असतांना शहरात मात्र पुन्हा नव्याने एका शाळेसाठी जुळवाजुळव सुरू आहे. या शाळेत वाढणारे तापमान, त्याचा प्राणीमात्रांवर होणारा परिणाम अन् पाणीटंचाई यांचा विचार प्रामुख्याने करण्यात आला आहे. नेचर क्लब ऑफ नाशिकच्या वतीने दुसऱ्या वर्षीही पक्ष्यांची शाळा भरणार असून यंदा हे वर्ग गोदा किनारी असलेल्या संत गाडगेबाबा आश्रमशाळेच्या आवारात होणार आहेत. या शाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी गरजेची नसून केवळ पर्यावरणाचा आदर आणि संवर्धन ही इच्छा अपेक्षित आहे.
सुजाण नागरिक म्हणून पर्यावरणाचे संवर्धन हे कर्तव्य आहे असे मानणाऱ्या मंडळीसाठी क्लबने ‘पक्ष्यांची शाळा’ ही अनोखी संकल्पना मांडली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने सर्वसामान्यांचे हाल होत आहे. या वातावरणात वन्यजीव, पशुपक्षी यांचे स्थलांतर मोठय़ा प्रमाणावर होते. हाच धागा पकडत क्लबने पक्ष्यांसाठी शाळा सुरू करण्याचे ठरवले. मागील वर्षी शाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदा हे वर्ग मध्यवर्ती भागातील संत गाडगेबाबा आश्रमशाळेच्या आवारात होणार आहेत. मानवी वस्तीमध्ये पक्षी येतील का, ही शंका असली तरी गोदा किनाऱ्यावर विभिन्न प्रकारचे पक्षी आहेत. बगळ्यांची स्वतंत्र वसाहत आहे. तसेच पानथळावर राहणारे पक्षी वेगळेच. गोदा पात्रेतील पाणी कमी होत असतांना त्यांना स्थलांतर करावे लागू नये यासाठी यंदा नदी काठालगतची जागा निवडण्यात आली. पक्ष्यांना लागणारे खाद्य, ते ठेवण्यासाठी भांडी, पिण्याचे पाणी, त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था आदी साहित्य तयार करण्यासाठी टाकाऊतून टिकाऊकडे लक्ष देण्यात आले आहे. त्या दृष्टीने वर्गात सध्या स्वच्छता मोहीम सुरू आहे. लवकरच तेथे शालेय विद्यार्थी व पर्यावरणप्रेमींना सोबत घेत साहित्य तयार करण्यास सुरुवात होणार आहे. तसेच जुन्या टायरपासून कृत्रिम पाण्याचे तळे तयार केले जाईल. जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यासही करता येणार आहे.




१५ एप्रिलपासून सकाळी सात ते दहा वेळेत हे वर्ग होणार असून त्या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पक्ष्यांची ओळख, त्यांची घरटी कशी तयार करायची, पक्ष्यांचे खाद्य कोणते, त्यांचे आवाज या सर्वाचा अभ्यास करता येणार आहे.
पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घ्यावा
पक्ष्यांची शाळा हा उपक्रम क्लबच्या पुढाकारातून होत असला तरी तो सर्वासाठी खुला आहे. पक्ष्यांच्या शाळेसाठी वापरले जाणारे साहित्य पर्यावरणपूरक आहे. पक्ष्यांचे खाद्य व पाणी याची व्यवस्था क्लब करणार आहे. विद्यार्थ्यांना यामुळे पक्ष्यांची माहिती होईल तसेच जखमी पक्ष्यांवर उपचार कसे करतात याचेही प्रशिक्षण दिले जाईल.
–प्रा. आनंद बोरा (अध्यक्ष, नेचर क्लब ऑफ नाशिक)