देश-विदेशातील ३० हजारांहून अधिक पक्षी; ज्येष्ठांसाठी खास कॅमेऱ्याची सुविधा

चारुशीला कुलकर्णी

chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला

नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत हजारो देशी-विदेशी पक्ष्यांचे जणूकाही संमेलन भरले आहे. उत्तरेकडील भागात बर्फवृष्टी होत असल्याने पक्ष्यांचे स्थलांतराचे प्रमाण वाढत आहे. नांदुरमध्यमेश्वरमधील पोषक स्थिती व मुबलक खाद्यामुळे पक्ष्यांची संख्या या वर्षी ३० हजारहून अधिकवर पोहोचली आहे. ज्येष्ठांना पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता यावा, याकरिता खास कॅमेरे बसवून पडद्यावर त्यांचे दर्शन घडविले जात आहे.  गोदावरी, कादवा नदीच्या संगमावरील नांदुरमध्यमेश्वर बंधारा परिसरात पक्षी अभयारण्य आहे. वर्षांनुवर्ष नदीच्या प्रवाहात गाळ साचल्याने मातीचे उंचवटे तयार झाले. जलाशयातील उधळ पाणी, विपुल जलचर, विविध पाणवनस्पती, वृक्षराई, सभोवतालची शेती ही पोषक स्थिती पक्ष्यांच्या अधिवासास पोषक ठरते. जलाशयात २४ प्रकारचे मासे आहेत. गारवा वाढला की, अभयारण्यात पक्ष्यांची रेलचेल होते. तापमानाचा पारा खाली उतरत असताना हजारो पक्ष्यांचा अभयारण्यात किलबिलाट होत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा पक्ष्यांचे प्रमाण वाढले आहे.

वन विभागाने चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, मध्यमेश्वरी, गोदावरी नदीपात्र, कोठुर, कुरूडगाव, काथरगांव परिसरात पक्षी गणना केली. सद्यस्थितीत अभयारण्य परिसरात २८ हजार ७२८ पाणपक्षी आणि एक हजार ७८५ झाडांवरील, गवताळ भागातील असे एकूण ३० हजार ५१३ पक्षी आढळून आले. यात विदेशी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या लक्षणिय आहे. प्लेमिंगो, ऑस्पप्रे, कॉमन क्रेन, नॉर्यन शॉवलर, पिनटेल, गार्गनी, युरेशियन व्हिजन, गजवाल, रुडी शेल डक, मार्श हॅरियर, मॉन्टेग्यु हॅरियर, ब्लू थ्रोड , ब्लु चिक बी ईटर,गोल्डन फ्लॉवर तसेच स्थानिक पक्ष्यांमध्ये उघडय़ा चोचीचा बगळा, शेकाटय़ा, नदीसुरय आदी सर्वाचे लक्ष वेधत आहेत. पक्ष्यांची वाढती संख्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. भल्या सकाळी नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी दर्शनासाठी गर्दी होत आहे.  नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यास दोन वर्षांपूर्वी रामसरचा दर्जा मिळाला. तो टिकवून ठेवण्याचे आव्हान वन विभागासमोर असतांना पर्यटक तसेच पक्ष्यांसाठी विविध सुविधा उभारल्या जात आहेत. अभयारण्यात रस्त्यांची दुरुस्ती प्रगतिपथावर आहे. पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली. पर्यटकांना निवासाची व्यवस्था करण्यात आली असली तरी सध्या विश्रामगृहाची दुरुस्ती सुरू आहे. 

दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन

अभयारण्य परिसरात चापडगावजवळ सायबेरियातून आलेल्या दुर्मीळ ल्युसिस्टिकचे (थापटय़ा) दर्शन झाले. थापटय़ा किंवा परी बदक हिवाळय़ात भारतात स्थलांतर करणारे बदक असून मुख्यत्वे सायबेरियातून येतात. या पक्ष्याचे डोके व मान चमकदार काळपट हिरवी असून छातीचा रंग पांढराशुभ्र असतो. किडे, अळय़ा, लहान बेडूक, शंख शिंपले, लहान मासे आणि सर्व प्रकारच्या बिया हे त्यांचे खाद्य आहे. त्यांची चोच जास्तच लांब आणि पुढे अगदी चपट फावडय़ासारखी असते. म्हणूनच त्याचे नाव थापटय़ा पडले असावे, असे पक्षीमित्र सांगतात.

गतवर्षीच्या गणनेत २६ हजार पक्षी आढळले होते. या वर्षी त्यात चांगलीच वाढ झाली. उत्तरेकडे बर्फवृष्टी वाढत असल्याने पक्ष्यांचे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. अभयारण्यातील वातावरण आल्हाददायक असून या ठिकाणी पक्ष्यांना खाद्य मोठय़ा प्रमाणात मिळत असल्याने ही संख्या वृद्धिंगत होत आहे. विदेशी पक्ष्यांच्या नोंदीसाठी रिंगिगचा उपक्रम महिनाअखेरीस राबविला जाणार आहे. दरम्यान, पर्यटकांमध्ये ज्येष्ठांसाठी पीटीझेड कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांना पडद्यावर पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटता येत आहे.

– शेखर देवकर (वनक्षेत्रपाल, नांदुरमध्यमेश्वर)