नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. सातपूर येथे पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शहरी, ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी देण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजप महानगरच्या वतीने सरकारवाडा पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

सातपूर येथे पटोले यांच्या विरोधात भाजपच्या आमदार सीमा हिरे, महानगरप्रमुख गिरीश पालवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. द्या टोले, नाना पटोले अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पटोलेंच्या  प्रतिमेला काळे फासत जोडे मारले. राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाविषयी कोणी अपशब्द वापरत असेल तर संबंधितावर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे, याकडे आमदार हिरे यांनी लक्ष वेधले. पटोले यांच्या विधानाचे ग्रामीण भागातही तीव्र पडसाद उमटले.

भाजपचे देवळा तालुकाअध्यक्ष किशोर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी देवळा पोलीस ठाण्यात निवेदन दिले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp aggressive against congress state president nana patole over modi remark zws
First published on: 19-01-2022 at 01:57 IST