नाशिक : इतर मागासवर्गीय घटकांना राजकीय आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत संबंधितांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
राज्यामध्ये इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणाकडे सरकार गांभीर्याने बघत नसल्याने संबंधित समाजाचा संयम सुटत असल्याचे भाजपने म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी वेळोवेळी सरकारला इशारा देऊनही सरकार गंभीर नसल्याने ओबीसी मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ७३ -७४ व्या घटना दुरुस्तीन्वये देण्यात आलेल्या नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने सांख्यिकी माहिती आणि तीन कसोटय़ांचे पालन करेपर्यंत स्थगिती दिलेली आहे. इतर मागासवर्गीयांची सखोल आणि अनुभवाधिष्ठित आकडेवारी जमा करण्यासाठी राज्य सरकारने समर्पित आयोग स्थापन केला आहे. या वेळी आ. देवयानी फरांदे यांनी राज्यातील ठाकरे सरकारने इतर मागासवर्गीय समाजाचे राजकीय आरक्षण घालवले असल्याचा आरोप केला. या सरकारचे मंत्री अपयश झाकण्यासाठी न्यायालयाच्या निकालावर प्रश्न उपस्थित करीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामे दिले पाहिजेत, अशी मागणीही फरांदे यांनी केली.
मंडल आयोगाला शिवसेनेने पािठबा दिला नव्हता म्हणून भुजबळ यांनी शिवसेना सोडली होती. इतर मागासवर्गीय आरक्षण गेल्यावर ते ठाकरे सरकारला या आरक्षणासाठी ठणकावणार का, असा प्रश्नही फरांदे यांनी उपस्थित केला. आ. सीमा हिरे यांनीही ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. इतर राज्यात आरक्षणाचा तिढा सुटला असताना राज्यात प्रश्न कायम आहे. वेगवेगळय़ा प्रश्नांवर सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे आदी उपस्थित होते.