जळगाव : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा राजकीय पक्षांपेक्षा बंडखोर उमेदवारच अधिक डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. खासकरून सत्ताधारी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा आपल्याच पक्षातील नाराजांनी उभ्या केलेल्या बंडखोरीचा अधिक धसका घेतला आहे. बंडखोर आणि अपक्षांना रोखणे आता भाजप नेते गिरीश महाजन आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

महापालिकेच्या एकूण ७५ जागांपैकी तब्बल २२ जागांवर अपक्ष उमेदवारांनी थेट लढत निर्माण केली आहे. विशेष म्हणजे या अपक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी आणि प्रमुख पक्षांतील बंडखोरांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार भाजप आणि शिवसेनेतील मिळून १४ बंडखोर उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध दंड थोपटले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढली असून, अनेक प्रभागांतील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. तिकीट न मिळाल्याच्या नाराजीमुळे किंवा स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे अनेक इच्छुकांनी पक्ष शिस्त झुगारून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांची स्थानिक पातळीवर मजबूत पकड असल्याने अधिकृत उमेदवारांना मतविभाजनाची मोठी भीती भेडसावत आहे. याचा थेट फायदा विरोधी पक्षांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, पक्षादेश झुगारून बंडखोरी करणाऱ्या किंवा बंडखोरांना समर्थन देणाऱ्या तब्बल ३० पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची विशेषतः भाजपने आतापर्यंत हकालपट्टी केली आहे.

कोणत्या ठिकाणी कोणाचे आव्हान ?

प्रभाग १ अ मध्ये भाजप उमेदवार रिटा सपकाळे यांच्यासमोर भाजपच्याच बंडखोर अपक्ष उमेदवार प्रिया जोहरे यांनी आव्हान उभे केले आहे. प्रभाग ३ अ मध्ये भाजपच्या अर्चना पाटील यांना बंडखोर मिना सपकाळे यांनी आव्हान दिले आहे. प्रभाग ३ ब मध्ये भाजपच्या प्रतीक्षा सोनवणे यांच्या विरोधात बंडखोर रंजना सपकाळे आणि कांचन सोनवणे तसेच चैताली ठाकरे, वर्षा सोनवणे यांनी आव्हान दिले आहे. प्रभाग ३ क मध्ये शिवसेनेचे प्रविण कोल्हे यांच्यासमोर अपक्ष प्रमोद शिंपी, सागर सोनवणे यांचे आव्हान आहे. प्रभाग ४ ब मध्ये भाजपचे मुकूंद सोनवणे यांच्यासमोर बंडखोर चेतना चौधरी व कोकीळा पाटील अपक्ष उभ्या आहेत. प्रभाग ४ क मध्ये भाजपचे कल्पेश सोनवणे यांच्याविरुद्ध भाजप बंडखोर चेतन गणेश सनकत उभे ठाकले आहे. प्रभाग ५ अ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार पीयूष पाटील उभे आहेत.

प्रभाग ५ ड मध्ये भाजपचे माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासमोर अपक्ष सुनील माळी, अश्विन भोळे व भाजप बंडखोर अनिल पगारिया यांचे आव्हान आहे. प्रभाग ६ ब मध्ये भाजपच्या अॅड. शुचिता हाडा यांच्या विरुद्ध अपक्ष मंगला पाटील यांचे आव्हान आहे. प्रभाग ७ ड मध्ये भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांना भाजप बंडखोर प्रा. सचिन पाटील यांनी आव्हान दिले आहे. प्रभाग ८ क मध्ये भाजपचे अमर जैन यांच्या विरोधात भाजप बंडखोर विजय पाटील यांचा अपक्ष अर्ज आहे. प्रभाग ९ क मध्ये भाजपच्या जयश्री पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार सुनंदा सुधाकर पाटील यांचे आव्हान आहे. प्रभाग ११ ब मध्ये शिवसेना शिंदे गटाचे संतोष पाटील यांच्यासमोर भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार कैलास पाटील यांचे आव्हान आहे. प्रभाग ११ ड मध्ये शिंदे गटाचे ललित कोल्हे यांना भाजप बंडखोर सुनील पाटील यांनी आव्हान दिला आहे.

प्रभाग १२ अ मध्ये भाजपचे अनिल अडकमोल यांच्यासमोर बंडखोर किशोर भोसले आहेत. प्रभाग १२ ड मध्ये भाजपचे नितीन बरडे यांचा बंडखोर स्वप्निल चौधरी यांच्यासोबत सामना रंगला आहे. प्रभाग १३ अ मध्ये भाजपचे नितीन सपके यांच्या विरोधात अपक्ष ॲड. सत्यजित पाटील तर सुरेखा तायडे यांना अपक्ष डॉ. अश्विनी वाघ यांचे आव्हान आहे. प्रभाग १३ ड मध्ये अजित पवार गटाचे प्रफुल्ल देवकर यांना भाजप बंडखोर जितेंद्र मराठे यांनी आव्हान दिले आहे. प्रभाग १६ ब मध्ये भाजपच्या वंदना इंगळे यांच्यासमोर अपक्ष हर्षाली मनीष कोल्हे यांचे तर १६ क मध्ये रंजना वानखेडे यांच्यासमोर अपक्ष ईच्छा अत्तरदे यांनी आव्हान उभे केले आहे.