नाशिक: महापालिकेत एकहाती सत्ता मिळवून अखेरच्या क्षणी भाजपने शिवसेना शिंदे गटाला भागीदार केले. परस्परांविरोधात लढणारे दोन्ही पक्ष अखेरीस एकत्र आले. आता याच सत्तेचा दाखला देत भाजपने चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीत प्रलंबित समस्यांचे निराकरण आणि प्रभागनिहाय विकास कामे यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. याकरिता ५०० कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
कुंभमेळ्यासाठी सुमारे २५ हजार कोटींची कामे हाती घेण्यात आल्याचे भाजपच्या नेत्यांकडून नेहमीच सांगितले जाते. शहरात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. काही योजनांसाठी महापालिकेने ४०० कोटींचे कर्जरोखेही काढले. कुंभमेळा कामांचा परिणाम अन्य कामांवर होत आहे. अलीकडेच स्थायी समितीने मनपाच्या २०२६-२७ वर्षाच्या ३०१० कोटींच्या अर्थसंकल्पाला सूचना व दुरुस्तीसह मंजुरी दिली. कुंभमेळ्यातील कामांसाठी पालिकेवर स्वनिधीचा मोठा भार पडला आहे. बहुदा यामुळे भाजपचे स्थायी सभापती मच्छिंद्र सानप यांना प्रभागनिहाय कामांसाठी विशेष निधी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करावी लागल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे.
महापालिकेत चार वर्ष प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे विकास कामे थांबलेली होती. आता महायुतीची एकहाती सत्ता आली असून सर्वाधिक नगरसेवक हे महायुतीचे आहेत. संबंधितांची प्रभागातील विकास कामे करण्यासाठी निधीची गरज आहे. शहराची लोकसंख्या वाढत असून मूलभूत सोयी सुविधांवर मोठा ताण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनाही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पुढील वर्षी कुंभमेळा होत असून देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे आवश्यक असल्याकडे स्थायी सभापती सानप यांनी लक्ष वेधले.
अडचणींचा पाढा
अनेक प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून त्यांची दुरुस्ती करणे क्रमप्राप्त आहे. अनेक भागात नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. या समस्येचे निराकरण जलवाहिनी, जलकुंभ, पाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारणीतून करता येईल. वाढत्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी कचरा संकलन व व्यवस्थापन यंत्रणा बळट करावी लागणार आहे. अनेक प्रभागात गटार व्यवस्था अपुरी असुून पावसाळ्यात पाणी साचणे व गटारी तुंबण्याच्या समस्या उद्भवतात. नवीन गटार व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया केंद्राची निकड आहे. महापालिकेचे दवाखाने सुसज्ज करणे, नवीन आरोग्य केंद्र, उद्याने, स्वच्छतागृह व इतर मूलभूत सुविधा विकसित कराव्या लागतील. शहरातील समस्यांचा पाढा वाचत स्थायी सभापती सानप यांनी उपरोक्त कामांसाठी ४०० ते ५०० कोटींचा निधी उपलब्ध करण्याचा आग्रह धरला आहे.
