मालेगाव : त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना धार्मिक स्थळाची नासधूस झाल्याची बनावट चित्रफित पसरवून मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे दंगली घडवून आणल्या गेल्याचा आरोप करत या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी करण्यात यावी,अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर आणि सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी या संदर्भात येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांचा हेतू काय होता, त्यात कोण गुंतले आहे, याच्या मुळाशी जाण्यासाठी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी नगरसेवक सुनील गायकवाड, पक्षाचे तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, दीपक पवार, दादा जाधव, लकी गिल, उमाकांत कदम, संजय काळे, अरुण पाटील आदी उपस्थित होते.

जमावाचे अचानक रस्त्यावर उतरणे, दुकाने, कार्यालये आणि पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करणे या सर्व प्रकाराचा पक्षातर्फे निषेध करण्यात आला आहे. जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्याने अमरावतीमध्ये लोक रस्त्यावर उतरले. ते कोणत्याही एका पक्षाचे नव्हते किंवा कोणी त्यांचे नेतृत्व करत नव्हते. स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या या नागरिकांवरही हल्ले केले गेले. असे असतांना पोलीस यंत्रणेकडून दंगल करणाऱ्यांना पाठीशी घालत स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांवर पक्षपाती कारवाई केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना आणि त्यांच्या समर्थकांना अटक करावी, रझा अकादमी या संघटनेवर बंदी घालावी, भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित पध्दतीने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्याही पक्षातर्फे करण्यात आल्या. 

नाशिकमध्ये निदर्शने

मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे जमावाने धुडगूस घालत नुकसान केल्याचा आरोप करत सोमवारी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. भाजपचे आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, विजय साने आदींच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जमा झाले होते. महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दंगलीतील सूत्रधारांना अटक करावी, नागरिकांसह भाजप कार्यकर्त्यांवरील चुकीची कारवाई थांबवून त्यांच्याविरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.