जळगाव : महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या १६ सदस्यांसह महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांची निवड सोमवारी विशेष महासभेत करण्यात आली. पहिल्याच वर्षी तिन्ही प्रमुख पक्षांनी अनुभवी नगरसेवकांना प्राधान्य देत दोन्ही समित्यांची बांधणी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. अर्थात, दोन्ही समित्यांवर मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपचाच वरचष्मा दिसून आला.

महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष महासभेस उपमहापौर मनोज चौधरी, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून स्थायी समिती सदस्यांची नावे बंद पाकिटातून सादर करण्यात आली. महापौरांनी सभागृहात या नावांचे वाचन करताच निवड झालेल्या सदस्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले. १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपचे १०, शिवसेनेचे पाच आणि ठाकरे गटाचा एक सदस्य अशी निवड झाली आहे.

भाजपकडून दीपक सूर्यवंशी, नितीन लढ्ढा, विशाल भोळे, डॉ. चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे आणि नितीन सपके यांची निवड करण्यात आली. तर शिवसेना शिंदे गटाकडून विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे आणि सागर सोनवणे यांना संधी देण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाकडून इब्राहिम पटेल यांची निवड झाली.

नऊ सदस्यीय महिला व बालकल्याण समितीत भाजपचे पाच, शिवसेनेचे तीन आणि ठाकरे गटाचा एक सदस्य, अशी निवड झाली. भाजपकडून सुरेखा तायडे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, विद्या सोनवणे आणि गायत्री राणे यांची निवड करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून सिंधू कोल्हे, प्रतिभा देशमुख आणि डॉ.अमृता सोनवणे यांना संधी देण्यात आली. तर शिवसेना ठाकरे गटाकडून हिना बी शाकीर खान यांची निवड जाहीर करण्यात आली. या सर्व सदस्यांचे सभागृहात अभिनंदन करण्यात आले.

आता सभापतीपदाची उत्सुकता

स्थायी आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सभापतीपदाच्या निवडीकडे लागले आहे. सभापतीपदाची अधिकृत निवड प्रक्रिया विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडणार असल्याने पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. विविध पक्षांमध्ये अंतर्गत चर्चा, संभाव्य उमेदवारांची चाचपणी आणि समन्वय बैठका यांना सुरुवात होणार असल्याचे संकेत आहेत. स्थायी समिती ही महानगरपालिकेच्या कारभारातील अत्यंत महत्त्वाची समिती मानली जाते. आर्थिक तरतुदी, विकासकामांना मंजुरी, खर्चाचे नियोजन आणि विविध प्रस्तावांना अंतिम स्वरूप देण्याची जबाबदारी या समितीवर असते. त्यामुळे सभापतीपद कोणाकडे जाते, याला विशेष महत्त्व आहे. सत्ताधारी पक्षाकडून अनुभवी व प्रशासकीय कामकाजाची जाण असलेल्या सदस्याला संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय, महापालिकेतील महिला व बालकल्याण समिती देखील सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जाते. महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या योजना, बालकल्याण विषयक उपक्रम, आरोग्य व पोषण कार्यक्रम यांसारख्या विषयांवर या समितीचे कामकाज केंद्रित असते. त्यामुळे महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठीही सक्षम आणि सक्रिय सदस्याची निवड होणे अपेक्षित आहे.